व्यावसायिक यशाची गुरुकिल्ली : संवाद कौशल्य

संवाद हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. संवादाशिवाय जगण्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. इतिहासात जरा डोकावून पाहिलं तर लक्षात येतं, की थोर विद्वान, मोठमोठे योद्धे आणि संत महात्मे यांच्याकडे संवादाची एक अशी शक्ती होती, जिच्या मदतीने ते विशाल जनसमुदायावर आपली छाप पाडण्यात यशस्वी होत असत. आपल्या संवाद कौशल्याच्या शक्तीने ते लोकांचं मतपरिवर्तन घडवून आणत असत. असं सामर्थ्य आहे, ‘संवाद’ या कलेचं.

असं असूनही आपण आपल्या संवादाच्या क्षमतेबाबत उदासीनच असतो. आपण काय बोलतोय, ऐकतोय, लिहितोय याकडे आपलं फारसं लक्ष नसतं. संवाद-कलेला आपण गृहीतच धरून चालतो. ‘येईल आपोआप’ असाच आपला दृष्टिकोन असतो. सुसंवाद आपल्या वैयक्तिक नात्यांमध्ये महत्त्वाचा असतोच पण आपण जेव्हा एखाद्या व्यावसायिक संस्थेत नोकरी करत असतो, तेव्हा तर आपल्या संवादाचं योग्य भान ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं. आपण काय बोलतोय, कुणाशी बोलतोय, आपल्याला हवा तसा संवाद झालाय की नाही, या सगळ्यांबाबत नेहमी दक्ष रहावं लागतं. स्वत:च्या संवाद-कलेला वारंवार पडताळून पाहावं लागतं. सुसंवादाने माणसं जिंकता येतात. ‘बोलणार्‍याचं काहीही खपतं’ अशी आपल्याकडे म्हणच आहे ना? संवाद कौशल्य त्यालाच तर म्हणतात. आपल्याला जे म्हणायचंय ते ऐकणार्‍यापर्यंत तसंच पोहोचलं पाहिजे आणि जर ते ऐकणार्‍याला त्याचा अर्थच समजला नाही तर....? तिथेच गैरसमज सुरू होतात, मतभेद व्हायला सुरुवात होते. एकमेकातील नाती ताणली जातात. अशा संवादाला ‘विसंवाद’ अथवा ‘अपयशी संवाद’ म्हणावं लागेल. योग्य प्रकारे संवाद करता न येणं ही अपयशाची पहिली पायरी ठरू शकते, कारण सुसंवादाची प्राथमिक जबाबदारी नेहमी बोलणार्‍यावरच असते.

व्यावसायिक कंपन्यांमध्ये अथवा संस्थांमध्ये काम करताना ‘संवादावर’ जास्त भर दिलेला असतो. संवाद काम करणार्‍या लोकांना एकमेकांशी जोडतो. एक ‘टीमवर्क’ करायला मदत करतो. संस्थेची व्याख्याच अशी केली जाते, की एका विशिष्ट उद्देशाच्या पूर्ततेसाठी लोकांनी एकत्र येऊन उभारलेला लोकांचा समूह / टीम. हा विशिष्ट उद्देश व्यावसायिक कंपन्यांच्या दृष्टीने ‘यश’ आणि ‘पैसा’ हा असू शकतो. तर सेवाभावी ट्रस्टच्या बाबत हे उद्दिष्ट वेगळं असू शकतं. असं जरी असलं, तरी लोकांनी एकत्र येऊन, मिळून काम करणं दोन्हीकडे गरजेचं असतंच. अशी बहुविध विचारांची माणसं एकत्र येऊन काम करणार असतील, तर त्यांच्यात ‘सुसंवाद’ असणं अत्यावश्यक आहे. नाहीतर ‘दहा जणांची तोंडं दहा दिशेला’ असं काहीसं चित्र दिसू लागेल. या सगळ्यांना समान सूत्रात बांधून एकत्र काम करायला लावण्याचं कसब ‘मॅनेजमेंट’ला अर्थात व्यवस्थापनाला करावं लागतं आणि या कामासाठी त्यांचं मुख्य अस्त्र असतं, ‘संवादकौशल्य’. इतरही अनेक अस्त्रं असतात त्यांच्या भात्यात, पण सुसंवादाने बरेच प्रश्न सहज सोडवता येतात, हे तर कुणीच नाकारत नाही.

जेव्हा दोन किंवा अधिक माणसं एकमेकांशी बोलत असतात किंवा एखादा वक्ता जनसमुदायाशी संवाद साधत असतो, तेव्हा नेमकं काय घडत असतं? जो माणूस बोलत असतो, तो ऐकणार्‍यांना काही माहिती देत असतो, आपले विचार पटवून देतो, नवीन कल्पना मांडत असतो. ते नुसतंच बोलणं नसतं तर त्याहून अधिक काही घडत असतं, विचारांची देवाणघेवाण घडत असते. अशी बरीच उदाहरणं देता येतील, की संवाद साधतासाधता काही नवे विचार चमकून जातात, काही शोध लागतात. आपल्यालाही हा अनुभव आलेला असतोच. जेव्हा आपण द्विधा मन:स्थितीत असतो, चिंताग्रस्त असतो, काय करावं हे सुचत नसतं, अशा वेळी बर्‍याचदा आपल्या मनातले विचार, गोंधळ, चिंता आपण दुसर्‍याला सांगतासांगताच आपल्याला मार्ग सापडत जातो. कंपनीत किंवा कामाच्या ठिकाणीही अशाच प्रकारे उत्तरं शोधली जातात. संवादातूनच कितीतरी कल्पना, आराखडे, योजना मूर्त रूप घेत जातात. कंपन्यांसाठी किंवा संस्थांसाठी तर ‘संवाद’ ही एक लाइफलाइनच म्हणावी लागेल. कर्मचार्‍यांमध्ये सुसंवाद असेल तर कंपनीची भरभराट होईल. त्यातही संस्थेची अंतर्गत यंत्रणा जितकी जास्त गुंतागुंतीची असेल, तितकी संवादाची गरज जास्त वाढत असते.

एक नक्की, की आपल्याला आपल्या नोकरीत, व्यवसायात अथवा वैयक्तिक आयुष्यातही यशस्वी व्हायचं असेल तर आपल्यातल्या संवाद कलेला प्रयत्नपूर्वक सुधारावं लागेल. त्यासाठी संवादाचे विविध पैलू समजून घ्यावे लागतील. या पुस्तकाद्वारे हाच प्रयत्न आपण करणार आहोत. आपलं पहिलं पाऊल तर पुढे पडलंच आहे. चिकाटीने पुढे प्रयत्न करू यात.

-  डॉ. आशा भागवत 

हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा - 

संवाद कौशल्य | Sanwad Kaushalye | Communication skills | dpbooks.in | Marathi Books – Diamond Publications Pune