प्रस्तावना : राया - विजयनगरचा सम्राट कृष्णदेवरायाची विलक्षण चरित्र गाथा

प्रस्तावना

१५१५ सालच्या हिवाळ्यात एका बलाढ्य सैन्याने, तेलुगू प्रदेशाच्या अगदी केंद्रस्थानी, कृष्णा नदीच्या काठी तळ ठोकलेला होता. या सैन्याचं नेतृत्व करणार्‍या कृष्णदेवरायाने एक दिवस शांतपणे जवळच्या एका देवळाची वाट धरली. भगवान विष्णूच्या एका स्थानिक अवताराची उपासना या देवळात केली जात होती. तो वैष्णवांसाठी मंगल समजला जाणारा एकादशीचा दिवस होता. विजयनगरचा राजा कृष्णदेवराय याने देवापुढे मस्तक टेकवण्यापूर्वी मोठ्या भक्तिभावाने उपवास केला होता. हा तरुण तुळू राजा दुसर्‍या दिवशी त्याच्या कारकिर्दीतली सर्वांत महत्त्वाची लढाई लढणार होता. त्या रात्री त्याला जे स्वप्न पडलं, ते स्वप्न त्याचं आयुष्य आणि त्याच्या प्रजेचं प्राक्तन कायमस्वरूपी पालटून टाकणार होतं.

कृपाळू आंध्र महाविष्णू स्वप्नात राजासमोर येऊन उभा राहिला - त्याचा तेजस्वी कृष्ण देह सोनेरी रेशीम-वस्त्र ल्यायलेला होता. त्याचे टपोरे नेत्र कमलपुष्पाप्रमाणे चमकत होते आणि त्याने छातीवर धारण केलेलं कौस्तुभ रत्न उगवत्या सूर्याहूनही लालजर्द दिसत होतं. स्वत: देव आपल्याशी अत्यंत सौम्य, पण गंभीर स्वरात बोलत असल्याचं बघून राजा आश्चर्यमुग्ध झाला होता; नतमस्तक झाला होता : "संस्कृतमध्ये तर तू यापूर्वीही लेखन केलं आहेस, पण आता तू लोकांच्या भाषेत, म्हणजेच तेलुगूमध्ये महाकाव्य लिहिलं पाहिजेस! श्रीरंगममध्ये झालेल्या अंडाळ आणि माझ्या लग्नाची कथा तू सर्वांना सांग. मी तेलुगू राजा असलो आणि तू कन्नडांचा राजा असलास, तरी विष्णू सर्वांसाठी एकच आहेत. माझ्या गौरवासाठी तू हे कर... तुझं भवितव्य दिवसागणिक उजळत जाईल!” भविष्याचं सूतोवाच करणार्‍या या शब्दांसह आंध्र महाविष्णू काळोखात दिसेनासा झाला.

दुसर्‍या दिवशी पहाटे कृष्णदेवरायाला जाग आली, तीच विस्मयचकित अवस्थेत! त्याने भक्तिभावाने धार्मिक विधी पूर्ण केले आणि मुख्य मंदिराच्या कळसाला वंदन केलं. नंतर लगेचच त्याने आपले सर्व पुजारी आणि ज्योतिषी यांना पाचारण केलं आणि आपल्याला पडलेल्या आश्चर्यकारक स्वप्नाचा वृत्तान्त त्यांना कथन केला. साक्षात देव अवतीर्ण झाल्याचं ऐकून समस्त सभा अचंबित झाली. हे मंगल स्वप्न म्हणजे विजय निश्चित असल्याचीच ग्वाही असल्याचं सगळ्यांनी राजाला सांगितलं. स्वत: भगवान विष्णू कर्नाटकच्या राजाला एका तमिळ स्त्री-संताबद्दल अभिजात तेलुगू भाषेत लिहिण्याचा आदेश देत होता! संपूर्ण दक्षिण भारत आपल्या सर्वसमावेशक छत्राखाली आणण्यासाठी आपण समर्थ असल्याची जाणीव कृष्णदेवरायाला झाली, आणि ही दैवी आज्ञा हृदयात कोरून या तरुण राजाने आपलं सैन्य एकत्र केलं आणि तो त्याच्या सर्वांत कट्टर शत्रूला तोंड देण्यासाठी सज्ज झाला!

साम्राज्याच्या उत्तर सीमेवर सतत कुरापती काढत राहणार्‍या पाच बहामनी सुलतानांपैकी कोणी त्याचा कट्टर शत्रू नव्हता. त्याचा कट्टर शत्रू कोणी असलाच, तर तो होता, कलिंगाचा गजपती राजा प्रतापरुद्रदेव. कृष्णा नदीच्या दक्षिणेकडे असलेल्या अनेक मोयाच्या प्रदेशांवर या स्वाभिमानी राजाने नियंत्रण प्राप्त केलं होतं आणि हे सगळे प्रदेश विजयनगरमध्ये पुन्हा घेण्याचा निर्धार कृष्णदेवरायाने केला होता. या दोन हिंदू राजांमधलं वैर दीर्घ काळापासून धुमसत होतं - प्रतापरुद्रदेव उच्च कुळात जन्मलेला क्षत्रिय होता. सूर्यवंशातल्या राजांचा प्रदीर्घ वारसा त्याला लाभलेला होता, तर कृष्णदेवराय निम्न समजल्या जाणार्‍या जातीत जन्मलेला, साधारण पार्श्वभूमीतून आलेला होता. प्रतापरुद्रदेवाने कृष्णदेवरायाला कायमच या हलकेपणाची जाणीव करून दिली होती. जेव्हा संधी मिळेल तेव्हा, ‘दासीपुत्र’ अर्थात ‘सेविकेचा मुलगा’ असं संबोधून तो कृष्णदेवरायाचा अपमान करत आला होता. त्याने कधीच कृष्णदेवरायाकडे बरोबरीच्या नात्याने बघितलं नव्हतं. त्याच्या बोचर्‍या टोमण्यांनी अखेर परिणाम साधला होता आणि या गर्विष्ठ शत्रूला त्याची जागा दाखवून देण्याचा ठाम निर्धार करून कृष्णदेवरायाने वाटचाल सुरू केली होती. आपल्या कर्तृत्वावर त्याचा पूर्ण विश्वास होता आणि आता तर भगवान विष्णूंनीही तेच संकेत दिले होते. आपली ही पात्रता आता जगापुढे सिद्ध करण्याचा निश्चय कृष्णदेवरायाने केला होता.

 

आज विजयनगरचा कृष्णदेवराय ‘दक्षिण भारतातली एक आख्यायिका ठरलेला राजा’ म्हणून ओळखला जातो. अनेक इतिहासकार त्याचं वर्णन ‘मुस्लीम आक्रमकांचा दारुण पराभव करणारा हिंदू योद्धा’ म्हणून करतात, ‘सम्राट पदापर्यंत जाऊन पोहोचलेला एक सामान्य शेतकरी’ असं काही जण त्याचं चित्र रंगवतात आणि काही जण त्याचं स्मरण ‘एक धूर्त राजनीतिज्ञ, उत्तम कवी आणि उदार राजा’ म्हणून करतात. यांतली प्रत्येक ओळख राजाच्या विलक्षण व्यक्तिमत्त्वात भर घालणारी आहे, पण कृष्णदेवराय या सगळ्या वर्णनांहून खूप अधिक होता. कृष्णदेवरायाचं व्यक्तिमत्त्व एवढं रोमांचक होण्यामागचं कारण म्हणजे, त्याच्या युगातल्या चैतन्याचा प्रत्येक पैलू या व्यक्तिमत्त्वात सामावलेला आहे. दक्षिण आशियात, तसंच संपूर्ण जगात कृष्णदेवरायाचा कालखंड सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनातल्या आमूलाग्र रूपांतरणाचा कालखंड होता. १५०९ ते १५२९ हा त्याचा दोन दशकांचा कार्यकाळ - ज्याला अभ्यासक आधुनिक-पूर्व कालखंड म्हणतात - त्या कालखंडात येतो. हा कालखंड जागतिक इतिहासात संक्रमणाचा कालखंड मानला जातो. या कालखंडात विविध संस्कृती एकमेकांच्या जवळ येत होत्या आणि त्यांच्यामध्ये संघर्षही होत होता. मात्र तोपर्यंत पृथ्वीच्या विस्तीर्ण भूभागावर युरोपीय वसाहतवाद्यांनी दावा केलेला नव्हता. म्हणूनच ‘प्राचीन राजा ते आधुनिक राजनीतिज्ञ’ या अत्यंत महत्त्वाच्या रूपांतरणाचं प्रतिनिधित्व कृष्णदेवराय करतो आणि या दृष्टीकोनातून बघितलं, तर तो भारतातला पहिला ‘जागतिक नेता’ ठरतो. आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करणं आणि परदेशी व्यापार-करारांसाठी वाटाघाटी करणं यांसारख्या आधुनिक समस्यांना त्याला तोंड द्यावं लागलं होतं आणि दुसर्‍या बाजूने जागतिकीकरण आणि बहुसांस्कृतिकता या आव्हानांनाही सामोरं जावं लागलं होतं. कृष्णदेवरायाच्या काळातला दख्खन म्हणजे हिंदू आणि मुस्लीम, उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय, पर्शियन आणि पोर्तुगीज या सगळ्यांची सरमिसळ होती. हे सगळे लोक इथे राहत होते आणि आपली आयुष्यं घडवत होते.

जगाच्या दृष्टीने ‘विजयनगर’ हे पौर्वात्य ऐश्वर्याचं प्रतीक होतं. हे एक बहुसांस्कृतिक महानगर होतं, संसाधनांच्या उपलब्धतेच्या दृष्टीने जगातलं सर्वांत समृद्ध नगर होतं. रोमहूनही विजयनगर अधिक भव्य होतं आणि तिथे श्रीमंती तर ओसंडून वाहत होती... अगदी हिरेही रस्त्याच्या कडेला टोपलीतून विकले जात होते! आणि या साम्राज्याच्या कळसस्थानी एक वैभवशाली सम्राट होता; सर्वांवर वचक असलेला, परिपूर्ण असलेला राजा होता! कृष्णदेवराय जिवंत असतानाच त्याच्या बाबतच्या दंतकथा सुरू झाल्या होत्या. राजाची स्तुती करणारे राजकवी, घोड्यांचा व्यापार करणार्‍या पोर्तुगिजांचे इतिहासकार आणि प्रवासी अशा कथेकर्‍यांनी या दंतकथा वाढवल्या होत्या. मात्र दंतकथा इतिहासाला मारक नसतात. उलट, इतिहास कशा पद्धतीने घडवला जातो आणि त्याचा प्रसार का होतो, याचा या दंतकथा नक्कीच महत्त्वपूर्ण घटक असतात. काल्पनिक गोष्टींमधून तथ्यं वेगळी काढणं, हा ऐतिहासिक संशोधनाचा एक भाग झाला आणि या काल्पनिक गोष्टींना संदर्भाच्या चौकटीत मांडून त्यांचा अन्वयार्थ लावणं, हा दुसरा भाग झाला. कारण चांगला इतिहास म्हणजे केवळ संपूर्ण सत्याचा पाठलाग करणं नव्हे, तर त्यातून अर्थबोध घेणं होय.

कृष्णदेवरायाच्या आख्यायिका त्याच्या मृत्यूनंतर सर्वदूर पसरल्या, पण त्याने जिवंतपणीच या आख्यायिकांना जाणीवपूर्वक चालना दिली होती. विशेषत: राजाने आंध्र महाविष्णूच्या सन्मानार्थ रचलेल्या ‘अमृतमाल्यदा’ या समृद्ध महाकाव्याच्या माध्यमातून या आख्यायिकांना सुरुवात झाली होती. १५१५मध्ये राजाला पडलेलं निर्णायक स्वप्न केवळ काल्पनिक नव्हतं; ती एका अविस्मरणीय साम्राज्यासाठी दैवी प्रेरणा होती!  

हे पुस्तक म्हणजे कृष्णदेवरायाच्या आयुष्याच्या अनेक कथनांपैकी केवळ एक कथन आहे. हे पुस्तक उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित आहे, पण आख्यायिका, लोकगीतं आणि लोकस्मृती यांचाही यात गांभीर्याने विचार करण्यात आला आहे. मी प्रथम कृष्णदेवरायाचं ‘अमृतमाल्यदा’ हे उत्कृष्ट काव्य वाचलं, तेव्हा भारावून गेलो होतो. अशा प्रकारच्या साहित्याकडे नेहमीच निव्वळ काल्पनिक रचना म्हणून बघितलं जातं. एक ऐतिहासिक स्रोत म्हणून क्वचितच याचा अभ्यास केला जातो. मात्र अशा साहित्याचं संवेदनशील वाचन नेहमीच कवीच्या मनाची एक अनन्यसाधारण खिडकी उघडून देतं, असं मला वाटतं. ‘अमृतमाल्यदा’मुळे आपल्याला एका थोर राजाच्या व्यक्तित्वाचं मर्मदर्शन होतं. या सर्व वैविध्यपूर्ण साहित्याच्या मदतीने मी प्रामाणिकपणे ‘कृष्णदेवराय’ सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. वैभवशाली जगाच्या केंद्रस्थानी कृष्णदेवरायाने जसं स्वत:ला बघितलं असेल, तसं त्याचं चित्र उभं करण्याचा हा प्रयत्न आहे.

- श्रीनिवास रेड्डी

 

राया हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा -