स्वभावाला औषध असते ! : प्रास्ताविक
स्वभावाला औषध नाही हे आपल्या मनावर इतके बिंबवले गेले आहे की, स्वतःत बदल करण्याच्या प्रयत्नांबद्दलही आपण साशंक होऊ लागतो. मग त्याविषयी तंत्रे, प्रशिक्षण किंवा त्यातील यशाचे दाखलेही थापाच वाटू लागतात, आणि तरीही प्रत्येकाला कधी ना कधी, कोणाच्या ना कोणाच्या बाबतीत, स्वभावाला औषध शोधण्याची गरज वाटलेली असते यात शंका नाही. ही गरज लक्षात घेऊनच या पुस्तकाची योजना आखली आहे.
असे औषध शोधणे ही काही नवी गोष्ट नाही. माणसाने, स्वतःचा विचार सुरू केला, तेव्हापासूनच अशी वेगवेगळी ‘औषधे’ ज्ञानी लोकांनी सांगितली. अनेक मार्ग, अनेक पंथ, त्यांची आपापली सांप्रदायिक पथ्यपरंपरा, त्यांची धारणा आणि हेतू हे अनेकदा पारलौकिक सुखाच्या कल्पनेशी निगडित असत. या वलयांच्या आतला गाभ्याचा भाग मानसिक यातना कमी करण्याचा आणि आनंदाची अवस्था प्राप्त करण्याचा असे. काय केल्याने अंतिम सुख किंवा चिरंतन आनंद मिळेल याचे संदेश आणि आदेश आपल्याला ठिकठिकाणी मिळू शकतात. या पुस्तकाची भूमिका अशा प्रकारच्या संदेशाची किंवा आदेशाची नाही. मानवी जीवन सर्वस्वी ताणमुक्त होणार नाही हे मान्य केले की, आपले ध्येयही "ताण कमी करणे” अशा चढण्याजोग्या पायरीवर येते आणि त्यातूनही जे ताण उरतील, अपरिहार्य असतील ते पेलण्याची ताकद कमावणे हाही उद्देश या प्रयत्नाच्या पाठीशी उभा राहतो. या पुस्तकातील विवेचन अंतिम किंवा परिपूर्ण नाही, हे मान्यच आहे. परंतु आधुनिक मनोविज्ञानाच्या मार्गाने प्राप्त झालेली तंत्रे वापरून बघण्यासाठी उपलब्ध व्हावीत यासाठी हा प्रयत्न आहे. तंत्रे अनेक आहेत, निवड ज्याने त्याने आपापली करावयाची आहे. आमचेच औषध गुणकारी असे काही आम्ही मानत नाही; पण त्यासंबंधी सर्वांगीण माहिती मात्र या ठिकाणी पुरवली आहे.
आपल्या स्वभावाची आपल्यालाच अडचण होते का? या प्रश्नाकडे लक्ष वेधावे, म्हणजे चिकित्सा आणि निदान योग्य प्रकारे होईल. अडचणी अनेक येतात. कधी बाह्य परिस्थितीतून, कधी इतरांच्या वागणुकीतून तर कधी हाती घेतलेल्या कामामधून. यातच भरीस भर म्हणून की काय, स्वतःच्या घडणीमधले कंगोरे गुंता वाढवायला कारणीभूत होतात. साधी गोष्ट. अनेकदा अनेक गोष्टींसाठी आपण रांगेत उभे राहतो. रांगा काही झरझर पुढे सरकत नाहीत. अनेक माणसे चिडचिड करून स्वतःचा ताप वाढवून घेतात. कधी रांग मोडण्याचा प्रयत्न करून प्रश्न वाढवून घेतात, तर कधी कंटाळून निघून जातात. तात्पुरती कटकट मिटवतात; पण केव्हातरी पुन्हा तिथे उभे राहावे लागणारच असते. पण आपण मात्र स्वतःच्या डोक्यावरच्या इतर दहा गोष्टीत या एका गोष्टीची भर घालून घेत असतो.
यामुळे, हे पुस्तक वाचत असताना जागोजाग थबकून आपल्या अनुभवाशी ताळा घेत राहणे महत्त्वाचे आहे. शांत निरीक्षणाने काय दिसते, काय लक्षात येते, यावरच स्वभावासाठीचे औषध सिद्ध होणार असते. आपण जसे आपल्या हाताने पायावर धोंडा पाडून घेऊ शकतो, त्याचप्रमाणे आपण स्वतःशी संवादही करू शकतो. हे पुस्तक अशा संवादाचा आरंभ करून देण्याचे निमित्त ठरले की या पुस्तकाचे काम झाले. पुढचे श्रेय ज्याचे त्याचे.
डॉ. सुधीर वनारसे
डॉ. श्यामला वनारसे
पुस्तक खरेदीसाठी पुढील लिंक क्लिक करा :