वाकाटककालीन विदर्भ : विदर्भाच्या काहीशा दुर्लक्षित इतिहासावर प्रकाश पाडणारे महत्वाचे पुस्तक

प्राचीन भारताच्या ऐतिहासिक कालखंडाचा विचार केल्यास उत्तरेत इसवी सन पूर्व ३०० च्या दरम्यान चंद्रगुप्त मौर्याने प्रथमत: केंद्रशासीत राज्यव्यवस्था निर्माण केली. सम्राट अशोकाच्या सोपारा स्तंभलेखावरून दक्षिणेत मौर्य साम्राज्याच्या सीमा म्हैसूरपर्यंत विस्तारलेल्या असल्याचे स्पष्ट होते. सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्विकारल्यानंतर धर्म प्रचारार्थ पाठविलेल्या स्ववीरांच्या नोंदी पाचव्या व तेराव्या शिलासनात आहेत. त्यात असलेले भोज, पेतनिक, रठिक, अपरांत इत्यादी उल्लेख; दक्षिण पंथाशी संबंधीत आहेत. त्यातील भोज राज्य म्हणजे ‘विदर्भ’ होय. अर्थात, इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात विदर्भ हा मौर्य अधिपत्त्याखाली असावा असे दिसते. पवनीस्तूप व सम्राट अशोकाचा देवटेक शिलालेख, याची साक्ष देतात.

मौर्यांच्या पतनानंतर शुंगाचे अधिपत्त्याखाली विदर्भ गेला असावा. कारण पुष्यमित्रशुंग, शुगांनभर गादीवर आलेला त्याचा मुलगा अग्निमित्र याने अवंती केंद्र करून विदर्भावर स्वारी करून विदर्भ जिंकून माधवसेन व यज्ञसेन या राजस्पर्धांमध्ये वाटून दिला, असा उल्लेख कालिदासने मालविकाग्निमित्रमध्ये केला आहे. वरदा (वर्धा) नदीमुळे विदर्भाचे दोन भाग झाले; असाही उल्लेख येतो. परंतु, शुंग शासनानंतर विदर्भात शुककुशान या परकीय सत्तांनी काही काळ पाय रोवला होता, असे रूपीअम्मनच्या पवनी स्तंभलेखावरून कळते.

दक्षिणेत सातवाहन सत्तेची राजधानी पैठण नावारूपाला आली. सातवाहन राजांनी विदर्भावरही राज्य प्रस्थापित केले. शक क्षत्रपांच्या परकीय आक्रमणांना पायाबंद घालून संपूर्ण महाराष्ट्रावर सातवाहनांनी साधारणत: इसवी सन पूर्व २३० ते इसवी सन २३० असे ४०० वर्षे राज्य केले.

प्राचीन विदर्भाच्या इतिहासात वाकाटकांचा काळ हा सुवर्णाक्षरांनी लिहावा लागेल असा हा कालखंड आहे. ‘वाकाटक’ घराण्याचा शासनकाळ साधारणत: इसवी सन २५० ते ५५० मानला जातो. या तीनशे वर्षाच्या काळात विदर्भाला वाकाटकांनी समृद्धी आणली. वाकाटक राजे पराक्रमी व ऐश्वर्यसंपन्न होते. तसेच ते प्रजाहितदक्ष, धर्मसहिष्णू, कला व स्थापत्याचे भोक्ते होते. हा कालखंड; राजकीयदृष्ट्या समृद्ध व आपला ठसा उमटविणारा कालखंड होता. विदर्भाला वाकाटक घराण्याच्या विविध राजांनी वैभव प्राप्त करून दिले. वाकाटकांच्या प्रबळ सत्तेने उत्तर आणि दक्षिण भारतावरही प्रभाव टाकला.

या पुस्तकाच्या लिखाणाचा हेतू हा की, काही वर्षांपूर्वी मी वाकाटक राज घराण्याविषयी संशोधनपर लेख लिहिले. वाचकांना ते फार आवडले, तर काहींनी या संशोधनाचे पुस्तक का करत नाही, असे विचारले. पण मला माझ्या इतर जबाबदार्‍यांमुळे पुस्तकाचे काम करता आले नाही. पण, आता हे पुस्तक प्रकाशित होण्याचा योग आला आहे. वाकाटकांनी विदर्भात ‘सुवर्णयुग’ निर्माण केले. परंतु त्यांच्याबद्दल अतिशय त्रोटक माहिती असल्याने हे पुस्तक निश्चितच संशोधक/अभ्यासक यांना उपयुक्त ठरेल.

 

वाकाटक काळाचा परिचय तसा सर्वांनाच आहे; पण त्यावर इतके मोठे संशोधन करण्याजोगे दस्तऐवज मिळतील हे अनपेक्षितच होते. यासाठी अतिशय दुर्लक्षित असे दस्तऐवज वाचण्याचा योग आला. आता या संशोधनाचा उपयोग संशोधकांना व वाचकांना व्हावा हा मानस आहे.

या पुस्तकात वाकाटकांविषयीच्या बहुतेक दानपत्रातील श्लोकांचे मराठी भाषांतर दिले आहे. त्यामुळे वाचकांना एकंदर विवेचन समजण्यास अडचण येणार नाही अशी आशा आहे. जिज्ञासू वाचकांस परिक्षणांची सत्यासत्यता स्वत: पडताळून पहाता यावी म्हणून महत्त्वाच्या ठिकाणी संदर्भ दिलेले आहेत.

या पुस्तकाची निर्मिती करीत असतांना अनेक ग्रंथांचा व लेखांचा मी उपयोग केला, त्यात डॉ. वा. वी. मिराशी, डॉ. अजय मित्र शास्त्री, डॉ. एम. के. ढवळीकर, डॉ. रा. श्री. मोरवंचीकर, डॉ. चंद्रशेखर गुप्ता यांच्या ग्रंथ व लेखांचा प्रामुख्याने समावेश होतो. या सर्वांची मी ऋणी आहे. माझे सासरे कै. डॉ. आर. यु. खेरडे यांचे ऋण मी विसरू शकत नाही. त्यांनी सतत दिलेली प्रेरणा म्हणजे माझे यश होय. माझे गुरूवर्य आदरणीय प्रा. पी. एन. देशमुख यांच्या मदतीमुळेच मी हे पुस्तक प्रकाशित करू शकले. याबरोबरच प्रा. कल्पनाताई पी. देशमुख यांनी माझ्या मराठीच्या अनेक चुका दुरुस्त करून दिल्या त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. प्रा. रघुनाथ क्षिरसागर यांनी मला अतिशय मौलिक मदत केली. त्यांचे आभार मानणे हे मी माझे कर्तव्य समजते. माझे सहचर डॉ. मोहन खेरडे यांच्या सततच्या प्रेरणेमुळे मी हे पुस्तक प्रकाशित करण्याचे मनावर घेतले. किंबहुना हे पुस्तक प्रकाशित न होता, तसेच पडून असते; पण त्यांनी केलेल्या मदतीमुळेच हे पुस्तक प्रकाशित झाले. माझ्या मुली

सौ. अर्चना व कु. आयेशा यांच्यामुळे हे पुस्तक लिहिण्यास वेळ मिळाला हे सांगणे मला अगत्याचे वाटते. माझी आई श्रीमती पुष्पाताई गिते हिने शिक्षणाचे महत्त्व जाणून आम्हा मुलींना सर्व प्रकारची हिंमत दिली, तिचे हे सर्व ऋण फेडणे कधीही शक्य नाही याची मला जाणीव आहे.

डायमंड पब्लिकेशन्स या प्रकाशनाने सदर पुस्तकाची निर्मिती आकर्षक आणि सुबक केली आहे. याशिवाय त्यांनी हे पुस्तक वेळेत पूर्ण करून ते वाचकांकरता उपलब्ध करून दिले, त्याबद्दल मी व्यक्तीश: त्यांची ऋणी आहे.

डॉ. मिनल खेरडे (गिते)

वाकाटककालीन विदर्भ  हे पुस्तक खरेदी करण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा -

https://dpbooks.in/products/vakatakkalin-vidarbh