समर्थ रामदासांचा ‘दासबोध’ हा ग्रंथ अभ्यासून आत्ताच्या काळात उपयुक्त ठरतील अशा काही ओव्या निवडल्या आहेत आणि सदर पुस्तकात त्यांचे साध्यासोप्या भाषेत विवरण केले आहे. समकालीन उदाहरणे देऊन दासबोधात सांगितलेला विचार अधिक स्पष्ट केला आहे. मराठीमध्ये अनेक संतांचे उत्तमोत्तम ग्रंथ आहेत, परंतु रामदासांच्या साहित्याचे स्थान वेगळे आहे. रामदास केवळ ज्ञान सांगत नाहीत, तर सृष्टीतील ज्ञान आत्मसात कसे करावे, त्यासाठीची साधने कोणती, उत्तम ग्रंथांचा अभ्यास कसा करावा याही विषयी मार्गदर्शन करतात. विद्याभ्यासाला त्यांनी अनन्य महत्त्व दिले आहे. व्यावसायिक जीवनात उपयुक्त असणार्या वेळचे व्यवस्थापन, नेतृत्वकला, ताण-तणावांचे व्यवस्थापन, सकारात्मक दृष्टीकोन अशा अनेक विषयांवर दासबोधामध्ये विवेचन आहे. समर्थ रामदासांना आळस, निष्क्रियता, निराशा यांचा अगदी तिटकारा होता. प्रयत्नवाद, चतुराई, सारासार विचार यांवर त्यांचा भर होता. दासबोधामध्ये राजकारण, समाजकारण, चातुर्यलक्षण, लोकसंग्रह या महत्त्वाच्या विषयांवर तर विस्ताराने सांगितले आहेच, पण बोलावे कसे (कम्युनिकेशन स्कील्स), अक्षर कसे काढावे, वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी इथपासून ते ज्ञानोपासना करणार्या व्यक्तीचा दिनक्रम कसा असावा इथपर्यंत विवेचन केले आहे. व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करून एक कार्यक्षम आणि यशस्वी आयुष्य जगण्यासाठी सदर पुस्तक वाचकांना निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो.
Marathi book on teachings of Samarth Ramdas. The book helps us understand how the teachings of Samarth Ramadas can help us develop an all rounder personality. His teachings can help us develop good habits and leadership qualities, and help us live a successful professional and persoanl life.