आता माझ्यापासून वीस यार्डांवर एक वाघ उभा होता. त्याच्या त्या सुंदर, चमकदार त्वचेवर हिवाळ्यातलं ऊन पडून ती आणखी चमकत होती. असं छायाचित्र मिळवण्यासाठी मी एरवी कुठेही गेलो असतो आणि काहीही दिलं असतं. मी अनेकदा तासन्तास किंवा दिवसच्या दिवस वाघाच्या मागावर राहिलो आहे आणि तो दिसल्यावर रायफल उंचावून, काळजीपूर्वक नेम धरून ती तशीच खाली घेतली आहे. नंतर त्या वाघाचं लक्ष वेधून घेऊन, डोक्यावरची टोपी उचलून त्याला अभिवादन केलं आहे. मला त्याला पाहण्याचा मिळालेला आनंद मी या पद्धतीने व्यक्त केला आहे.
रूढार्थाने ‘शिकारी’ असणार्या या माणसाचा प्रवास म्हणूनच शूटिंगपासून शूटिंगपर्यंत (शिकारीपासून चित्रीकरणापर्यंत) पोहोचल्याचं लक्षात येतं. शिकार करण्याने त्याला सावध, अभ्यासू आणि चिकित्सक केलं असलं, तरी हे सजगपण त्याला केवळ निसर्गाचा उपभोग घ्यायला शिकवत नाही... उलट ही त्याच्या निसर्गात विरघळत जाण्यासाठीची नांदी ठरते.