भारतामध्ये जे यशस्वी उद्योजक आहेत त्यांमध्ये केंद्रस्थानी झळकणार्या नावांमध्ये ‘बिर्ला’ हे नाव प्रमुख आहे. उद्योगजगतातील त्यांची यशस्विता दिमाखदार आहेच परंतु त्यांच्या घरातील धार्मिक वातावरण, आध्यात्मिक परंपरा आणि संवेदनशील भावबंध हे त्यांना भलेपणाच्या उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवतात.
बिर्ला परिवार हे एक विस्तारित कुटुंब आहे. ही कथा केवळ दोन व्यक्तींची नसून सार्या कुटुंबाची आहे आणि त्याबरोबरच उच्च मूल्यांची जपणूक करणार्या, भारतीय सभ्यतेतील दृढ प्रेमाच्या उच्च पातळीचीही आहे.
त्यांच्या आयुष्यात आलेल्या सुखाच्या प्रसंगांप्रमाणेच हृदय हेलवणार्या घटना व अंत:करण विदीर्ण करणार्या दुर्दैवी घटनांना त्यांनी ज्या धैर्याने व स्थितप्रज्ञतेने तोंड दिले त्याचे दर्शन येथे घडते. या दर्शनाने आपल्यालासुद्धा आध्यात्मिक संस्कारांचा सुवर्णस्पर्श झाल्याशिवाय राहात नाही.