काही स्त्रिया जन्मत:च उद्योगिनी असतात कारण त्यांच्या घरातील पिढ्यानपिढ्या चालणार्या व्यवसायामुळे त्यांना व्यवसायाचे बाळकडू मिळालेले असते, काही महिलांवर उद्योगाची जबाबदारी लादली जाते ती वडील, पती किंवा भावाच्या आजारपणामुळे किंवा अकाली निधनामुळे, तर काही महिला स्वत: प्रयत्नपूर्वक उद्योजिकेचे गुण विकसित करतात. अशा तिन्ही प्रकारांत मोडणार्या महिला आपल्याला या पुस्तकात भेटतात.
पतीच्या अकाली निधनानंतर अत्यंत खंबीरपणे व धडाडीने त्यांचा व्यवसाय चालवणार्या शीला साबळे व उद्योगाची माहिती नसताना कारखाना चालवणार्या उषा शिंदे, वडिलांच्या निधनानंतर एका कारखान्याचे तीन कारखाने करणार्या सुजाता सोपारकर आणि रेडिमेड ब्लाऊजचा व्यवसाय चालवणार्या श्वेता इनामदार इ. महिलांनी खडतर व बिकट वाट कशी पार केली ते वाचण्यासारखे आहे.
समाजाची गरज ओळखून निवडून, चिरून पॅक केलेल्या भाज्यांच्या पाकिटाचा रतीब पुरवणार्या लक्ष्मी मोरे, आङ्ग्रिकी व आखाती देशांत दुपट्टा, कापड पुरवणार्या रेखा कारखानीस, रजया तयार करून निर्यात करणार्या, रॉट-आयर्नच्या ङ्गर्निचर क्षेत्रात नाव कमावणार्या शैलजा सूर्यवंशी, पंचधान्यांचे व विविध प्रकारच्या लाडवांचा व्यवसाय करणार्या सेवा गोखले, आरामदायी गाद्यांची निर्मिती करणार्या
डॉ. सुजाता पवार इत्यादींनी नावीन्यपूर्ण व्यवसाय सुरू करून प्राप्त केलेले यश कौतुकास्पद आहे.
ब्रेडची हस्तकला विकसित करणारी कल्पना जव्हेरी, आंतरराष्ट्रीय ज्वेलरी डिझाईन स्पर्धेत तीन पारितोषिके मिळवणारी नीता भोसले, शिल्पकलेतील प्रावीण्याबद्दल पद्मश्री प्राप्त झालेल्या माणिनारायण, स्टॉल डिझाईनचे कौशल्य विकसित करणारी क्षमा दलाल, ऍवॉर्ड्सचे डिझाईन करणारी बीजल कलबाग, डोळे बांधून गणपतीच्या मूर्ती बनवणारी व लिमका बुक ऑङ्ग रेकॉर्ड्समध्ये तीनदा विक्रमांची नोंद झालेली रमा शाह, सर्व जाहिरातदारांना कृत्रिम पाने, ङ्गुले, वेली इ. पुरवणारी सुनीता नागपाल-मेनन इ. कलाकार महिलांनी अत्यंत मेहनतीने स्वत:ची कला कशी खुलवली आहे हे वाचणे हृदयंगम आहे. हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्रातल्या विविध उद्योगिनींची यशोगाथाच आहे.