प्राचीन इजिप्त आणि ग्रीक संस्कृतीत ‘फिनिक्स’ या पौराणिक पक्षाला महत्त्वाचे स्थान आहे. अमरत्व प्राप्त असलेला हा तेजस्वी पक्षी अखेरीस जळून राख होतो. परंतु याच राखेतून पुनर्जन्म घेऊन तो नव्या आयुष्यास सुरुवात करतो.
माणसाचे जीवनही असेच असते. आयुष्यात जेथे सर्व आशा, आकांक्षा लोप पावतात, तिथेच नव्या पर्वाची सुरुवात होते. जीवनातील कटू-सुखद अनुभवांतून नवीन भरारी घेण्यासाठी आपण स्वतःला सिद्ध करत असतो. ‘फिनिक्स भरारी’ या आत्मकथनातील रामकृष्ण गायकवाड यांचा झोपडपट्टी ते फायनान्स गुरु हा प्रवास असाच थक्क करणारा आणि वाचकांना नव-ऊर्जा देणारा आहे.
फिनिक्स पक्षाप्रमाणे प्रतिकूलतेच्या गर्तेतून गगनभरारी घेणाऱ्या रामकृष्ण गायकवाड यांची संघर्षमय चरित्र कहाणी वाचकांना आयुष्यातील आव्हानांशी सामना करण्याची प्रेरणा आणि सकारात्मकतेची अनुभूति देईल अशी खात्री वाटते.