‘टिपू सुलतान’ कसा होता ? तर तो एक उत्तम प्रशासक होता. टिपूने आपल्या राज्यात जलपुनर्भरण, कृषी धोरण, धरणे, व्याजविरहित बँकींग प्रणाली, कृषीपूरक उद्योग, साखर कारखान्यांची उभारणी, आधुनिक यंत्रनिर्मिती, वैद्यकीय क्षेत्रातील सुधारणा अशी विविध धोरणे राबवली. परराष्ट्र संबंध, जहाज बांधणी या क्षेत्रांत अविस्मरणीय कामगिरी केली. इतकेच नव्हे तर, त्याने रयतेसाठी ‘आठ कलमी’ घोषणापत्र प्रसिद्ध केले होते. ‘राज्यकर्ता म्हणून शासकीय खजिन्यात अपहार केल्यास मला फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच कोणत्याही लष्करी मोहिमेवर पाठवल्यास वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार काम करेन, यात कसूर केल्यास फाशी देण्यात यावी’, असे या जाहीरनाम्यात स्पष्ट केले होते. टिपूच्या ग्रंथालयात एक हजार ८८९ इतकी पुस्तके होती.
त्यातील सर्व पुस्तके केंब्रीज व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ग्रंथालयात आजही सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. टिपूने स्वत: ४४ पुस्तकांची निर्मिती केली आहे. टिपूची ही सर्व पुस्तके देशातील विविध पुराभिलेख विभागात जपून ठेवलेली आहेत. दुर्देवाने इतिहासात क्वचितच त्याची ही बाजू समोर आली आहे.
इतिहास संशोधक सरफराज अहमद यांनी या पुस्तकातून ‘खरा टिपू’ शोधून काढण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. हे पुस्तक संतुलित, न्यायपूर्ण इतिहास जगासमोर मांडून सामाजिक सौहार्द व एकात्मता सक्षम करण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य करू शकते.
हे पुस्तक इतिहासप्रेमी वाचक व संशोधकांच्या निश्चितच पसंतीस पडेल याची खात्री वाटते.