इतिहास-लेखन हे मानवाचे बौद्धिक अपत्य आहे. मानवी जीवनाशी निगडित कोणत्याही प्रश्नाचा वेध घेताना ऐतिहासिक दृष्टीचाच अवलंब करावा लागतो. त्या अर्थाने इतिहास ही भूतकाळाची कहाणी असली, तरी वर्तमानाची निकड आहे. गतकाळाच्या विश्लेषणातून मानवी जीवनाचा वर्तमान सुकर होतो ; तसेच हे विश्लेषण भविष्याचेही दिग्दर्शन करू शकते.
गेल्या काही वर्षांत इतिहासविषयक मोठे तत्त्वमंथन घडून आले. इतिहास म्हणजे काय, त्याचे अभ्यास-विषय, इतिहासाचे तत्त्वज्ञान, इतिहासाची संशोधनपद्धती, इतिहासलेखनातील वस्तुनिष्ठता अशा अनेक विषयांवर गहन चर्चा घडून आल्या. १८व्या शतकापासून इतिहासविषयक रूढ धारणांना आव्हान देणारे नवनवे प्रवाह अवतरू लागले. या प्रवाहांनी इतिहास या विद्याशाखेच्या कक्षा अपरिमित रुंदावल्या आहेत. मात्र, त्यांचा परामर्श घेणारे ग्रंथ मराठीत फारसे उपलब्ध नाहीत. प्रस्तुत पुस्तकाद्वारे ही उणीव दूर करण्याचा एक अल्पसा प्रयत्न केला आहे. इतिहास या विद्याशाखेच्या क्षितिजावर स्थानिक इतिहास, प्रादेशिक इतिहास, खाद्यसंस्कृतीचा इतिहास, पर्यावरणाचा इतिहास, स्त्रियांचा इतिहास, पुरुषत्वाचा इतिहास, अब्राह्मणी इतिहास, सबाल्टर्न अर्थात वंचितांचा इतिहास असे अनेक प्रवाह अवतीर्ण झाले आहेत. तसेच नवमार्क्सवाद, स्त्रीवाद, प्राच्य-प्रणाली, उत्तराधुनिकतावाद, जमातवाद अशा विविध विचारप्रणालींनी इतिहासलेखन प्रभावित केले. प्रस्तुत ग्रंथात या प्रवाहांचा व विचारप्रणालींचा परामर्श घेतला आहे.
इतिहास विषयातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थीगण, संशोधक व प्राध्यापकवर्ग यांना या ग्रंथाचा एक संदर्भग्रंथ म्हणून उपयोग होईल. तसेच या ग्रंथातील लेखांचा मानव्यविद्या, सामाजिकशास्त्रे व साहित्य यांच्या अभ्यासकांना व अन्य जिज्ञासू वाचकांनासुद्धा लाभ घेता येईल.