साधक, साधना आणि साध्य या त्रिसूत्रींना एकत्र बांधतो तो मंत्र. मंत्रोच्चारात जसे सामर्थ्य दडलेले असते तसेच मंत्र या शब्दात एक संदेश आपल्याला दिसून येतो. फोटो म्हणजेच प्रकाश आणि या प्रकाशाचा मंत्र ‘फोटोमंत्र’. फोटोग्राफीचे आपले स्वतंत्र असे अस्तित्व आहे. जन्माला आल्यापासुन मृत्युपर्यंत आपले जीवन विविध रंगांनी समृद्ध होत असते. या रंगांच्या आठवणींचे इंद्रधनुष्य म्हणजेच फोटो.
बालपण, तरूणपण आणि वार्धक्य या तीन अवस्थातून जाताना अनेक मौज मजेच्या गोष्टी तसेच सुखाचे व आनंदाचे क्षण प्रत्येकाच्या वाट्याला काही प्रमाणात का होईना येतच असतात. निसर्गाच्या सान्निध्यात फिरताना जीवनाची अनुभूती आपल्याला येत असते. अमूल्य अशा या क्षणांना चित्रबद्ध कसे करावे याचा मंत्र म्हणजेच फोटोमंत्र. मनोभावे याचा जप केल्यास फोटोसिद्धी नक्कीच प्राप्त होते.
सौ.अर्चना देशपांडे जोशी यांचं ‘फोटोमंत्र’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे याचा मला व्यक्तिशः आनंद होत आहे. फोटोग्राफी हे एक फक्त तंत्रच नाही तर एक कला आहे आणि या कलेला विचारांची बैठक आहे हे अर्चना यांच्या बोलण्यावरून कायमच प्रतीत होत राहतं आणि या कलातंत्राचा मंत्र आता ती आपल्या नव्या पुस्तकातून उलगडत आहे याची उत्सुकता एक कलाकार म्हणून मलाही आहेच.
संगीत आणि फोटोग्राफी यात वरवर काही साम्य नसलं तरी या दोहोंमध्ये एक साम्य आहे दोन्ही कलांमध्ये सौंदर्यपूर्ण पद्धतीने अवकाश भरावं लागतं. एकात सुरांनी तर दुसर्यात प्रकाशाने.
सौ.अर्चना देशपांडे-जोशी यांच्या ‘फोटोमंत्र’ या पुस्तकाला माझ्याकडून लक्ष लक्ष शुभेच्छा !
- कौशल इनामदार