"‘जर घडणार्या गोष्टींकडे मानवी दृष्टीकोनातून पाहण्याची आपली तयारी असेल, तर इतरांनी घेतलेले निर्णय आपल्याला विपरीत वाटले, तरी ‘हाच निर्णय योग्य आहे’ या विश्वासातून इतरांनी ते घेतलेले असतात, हे आपण समजून घेऊ शकतो.’
हे उद्गार एरवी आपल्याला कुणा संताचे किंवा तत्त्वज्ञाचे किंवा एखाद्या शिक्षकाचे वाटले असते. पण हे उद्गार भारतातल्या एका महत्त्वाच्या उद्योगपतीचे आहेत. त्यांचं नाव - जेआरडी टाटा!
जेआरडींच्या मृत्यूला आज ३१ वर्षं झाली, पण आजही टाटांच्या समूहाचा पाया त्यांनी घालून दिलेल्या तत्त्वांच्या आधारावर भक्कम उभा आहे. हा समूह देशातल्या... जगातल्या काही श्रीमंत समूहांपैकी एक आहे, पण समूह म्हणून असलेल्या त्यांच्या प्रतिमेत किंवा टाटांच्या कोणत्याही वागण्यात कुठेच बडेजाव नाही; देखावा नाही. ते कायम आपल्या कामासाठीच ओळखले जात राहिले. ‘उद्योजक’ या बिरुदाला जागणारी आणि त्याला स्वस्त न करणारी ही तत्त्वं येणार्या उद्योजकांना किंबहुना आपल्या सगळ्यांना नक्कीच वाट दाखवत राहतील!"