"मानवी इतिहासाचे अवलोकन केल्यास सामान्य माणसांनी आंतरिक ऊर्मीतून केलेल्या कृतींमधून बहुतांश इतिहास रचला गेल्याचे लक्षात येते. शास्त्रज्ञांचे शोध, कलाकारांच्या कलाकृती, समाज सुधारणा, विविध खाद्यपदार्थांच्या निर्मितीमागील कथा अशाच आंतरिक ऊर्मीचे दर्शन घडवतात. ठरवून केलेले विक्षिप्त प्रवास आणि जीवावर बेततील अशी साहसे करणार्या व्यक्तीही आंतरिक ऊर्मीने पछाडलेल्या दिसतात आणि इतिहास घडत जातो. या सत्यकथांमधून माणसातील सहृदयतेचे दर्शन होत रहाते तर कधीकधी हिंस्त्र प्रवृत्तीही जाणवते.
हजारो वर्षांच्या इतिहासातील ३६५ अनोख्या आणि वैविध्यपूर्ण सत्यकथांना आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या इतिहास घडवणार्या व्यक्तिमत्वांना या पुस्तकातून लेखक र. कृ. कुलकर्णी यांनी प्रस्तुत केले आहे. या कथा वाचकांसाठी मनोरंजक आणि विचारप्रवर्तक ठरतील याविषयी खात्री वाटते."