मिखाइल बुल्गाकवने ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी १९२५ सालच्या हिवाळ्यात लिहिली... साहित्यप्रकार म्हणून ही लघुकादंबरी एक ‘फॅन्टसी’ आणि ‘सामाजिक व्यंग (satire)’ आहे, असं मानलं जातं, परंतु तिची मुळं खूप खोलवर गेलेली दिसून येतील. क्रांतिपश्चात सभोवताली आकारास येत चाललेल्या नवीन जीवनाने रशियन समाजापुढे उभ्या केलेल्या आव्हानांना एका प्रतिभावंत लेखकाने दिलेलं प्रत्युत्तर, त्याबद्दल केलेलं विचारमंथन म्हणजे ही लघुकादंबरी होय.
या लघुकादंबरीत नवीन व्यवस्थेला लेखकाने काढलेले चिमटे नि सत्तेवरचं तीक्ष्ण व्यंग सेन्सॉर मंडळाला दिसलं नसतं, तरच नवल! मंडळाच्या लेखी ते हस्तलिखित क्रांतीवरचं विडंबन ठरलं; पण या भन्नाट लघुकादंबरीचा पैस तितकाच मर्यादित असता, तर तिला रशियात आणि जगभरात इतके वाचक कधीच लाभले नसते. ह्या विलक्षण कथेत लेखकाने उपस्थित केलेले प्रश्न स्थलकालाचा अवकाश भेदून वर्तमानात आपल्यासमोर उभे ठाकतात. ‘कुत्र्याचं काळीज’ तिच्या निसर्गत्वाच्या पुरस्कारासहित शंभर वर्षांपूर्वी जितकी प्रासंगिक होती, तितकीच ती आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता, कृत्रिम गर्भाधान नि इतर कृत्रिम गोष्टी यांच्या युगातही प्रासंगिक आहे.
- अलिक्सेय वर्लामव
(समकालीन रशियन लेखक, समीक्षक आणि बुल्गाकवचे चरित्रकार.)
A satirical Soviet-era novella where a stray dog’s transformation into a human exposes the dark side of forced social engineering and ideological experiments.




