अर्थशास्त्र विषयामध्ये साधारणत: १९६०च्या दशकापासून वेगवेगळ्या विषयांच्या स्वतंत्र व व्यापक मांडणीस गती प्राप्त झालेली आढळून येते. अर्थशास्त्रात नव्याने उदयास येत असलेल्या विविध अभ्यास विषयांचे स्वरुप हे मर्यादित न राहता ते आंतरविद्याशाखा व बहुविद्याशाखा दृष्टिकोनाचा अंगिकार करणारे आहे. अर्थशास्त्राच्या या़व्यापक स्वरुपातील मांडणीमध्ये आता आरोग्याचे अर्थशास्त्र, पर्यावरणाचे अर्थशास्त्र, श्रमाचे अर्थशास्त्र, सांस्कृतिक अर्थशास्त्र, नागरी अर्थशास्त्र अशा वेगवेगळ्या अभ्यास विषयांची मांडणी होऊ लागली आहे.
जागतिकीकरण व उदारीकरणाच्या पार्श्वभूमीवर वाढते औद्योगिकीकरण, वाढते नागरीकरण याचा व्यापक परिणाम जागतिक पातळीवर सर्वत्र दिसून येऊ लागला आहे. वाढत्या नागरीकरणाच्या समस्या व त्या सोडविण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना व त्यांचे अर्थशास्त्रीय पैलू यांचे विश्लेषण करणारा हा अभ्यासाचा विषय काळाच्या कसोटीवर महत्त्वाचा घटक बनू लागला आहे. त्या दृष्टिकोनातून नागरी अर्थशास्त्र विषयाचे हे प्रस्तुत पुस्तक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तर उपयुक्त ठरणारे आहेच, परंतु त्याचबरोबर ते समीक्षक, लेखक, वाचक, सामाजिक कार्यकर्ते, स्पर्धा परिक्षार्थी, संशोधक अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडणार्या समाजिक घटकांनाही संदर्भ ग‘ंथ म्हणून उपयुक्त ठरणारे आहे असा विश्वास आहे.