वास्तव... त्या वास्तवाचा मागोवा घेऊन विषयनिर्मिती करणारे पत्रकार, जाहिरातदार, लेखक, नाटककार, नट, चित्रकार, चित्रपटकार इत्यादी. विषयनिर्मिती करणार्या संस्था, त्यांच्यातील प्रक्रियांवर असलेली आर्थिक, सामाजिक, राजकीय, नैतिक, बंधने आणि शेवटी या विषयांचा उपभोग घेणारे ग्राहक, श्रोते, वाचक, प्रेक्षक इत्यादी या सगळ्यांमधील गुंतागुंत वाढत चालली आहे. यांसोबत माहिती तंत्रज्ञान लोकांच्या हाताला लागले आहे. यामुळे या सर्व प्रक्रियेचे संपूर्ण अर्थकारण बदलले आहे, उद्देश बदलले आहेत, उपयोग बदलले आहेत.
हे सगळे समजून घ्यायचे असेल तर माध्यमांच्या या अनेक पैलूंचा मागोवा, प्रतिमाने आणि अनेक सिद्धान्त तयार करून कसा घेतला गेला, हे समजून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर माध्यमांची समीक्षा कुठल्या कक्षात झाली आहे व पुढे कशी करावी लागेल, याचाही मागोवा घेणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी लागणारी माहिती देणे हे या पुस्तकाचे प्रयोजन आहे. माध्यमांशी आणि त्यांच्यातील विषयांशी ज्याचा ज्याचा संबंध आहे त्या व्यक्तीला हे पुस्तक उपयोगाचे ठरेल. माध्यमांचा मागोवा घ्यायचा असेल तर त्यासाठीची ही प्राथमिक आणि आवश्यक पायरी आहे.