कालातीत राजकीय भाष्य करणारी कलाकृती !
सत्तेचा विचार उघड करणारं अद्भुत वास्तव-कथन म्हणजे १९८४ ! माणसाच्या नैसर्गिक विपर्यासालाच अंतिम, सत्य व समर्थनीय ठरवणारी सत्ता, त्यातून घडत जाणारी बिनचेहर्याची माणसं आणि यात नैसर्गिक संवेदनशीलतेला पडत जाणारा भकासपणाचा विळखा ही कादंबरी कथानकाबरोबर अधिकाधिक घट्ट करत जाते. सत्तेच्या आकांक्षेनुरूप घडत व बदलत जाणारी समाजाच्या मनाची रचना व त्यासाठी सत्तेने राबवलेल्या मूलगामी पद्धती यांचं अफलातून भविष्यकथन जॉर्ज करत जातो. हे कथन पुढे सरकताना कल्पनेपलीकडचं वाटावं इतकं अस्सल उतरतं. म्हणूनच १९४८ साली लिहिलेली ही कादंबरी आजच्या घडीलाही तिचे कुठलेही संदर्भ हरवत नाही आणि कालातीत होते!
‘समाजवादी लोकशाहीची स्थापना’ या भूमिकेवर निष्ठा असणार्या जॉर्ज ऑरवेलचं एकूण लेखन म्हणजे ध्येयवादी स्वप्नांना पोखरत जाण्यार्या सत्तेचा आलेख आहे. केवळ ‘टेबली लेखक’ म्हणून न मिरवता त्याच्या लेखनातून कृतिशील आणि निर्भीड कार्यकर्ता आपल्यासमोर येत जातो. त्यामुळे उद्ध्वस्त होतानाही वास्तवाशी सामना करण्याची त्याची अभूतपूर्व ताकद वाचकाला घेरून टाकते!