महात्मा गांधींचे निधन होऊन ३० जानेवारी २०१२ रोजी ६४ वर्षे पूर्ण होत आहेत.
या महापुरुषाच्या सर्वंकष अशा जीवनविषयक विचारांचा प्रभाव गेली अनेक वर्षे कायम आहे आणि यापुढेही तो तसाच निरंतर राहणार आहे.
गांधीजींची अहिंसा, शांतता, संवाद आणि समन्वय ही मूलभूत मूल्ये आजच्या बदलत्या वैज्ञानिक-यांत्रिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक पर्यावरणातही सुसंगत आहेत.
गांधीजींचे विचार सर्व स्तरांमधील आणि सर्व वर्गांमधील माणसाला अंतर्मुख करणारे आहेत, एवढेच नव्हे तर आजच्या जीवघेण्या जीवनसंघर्षात आपापल्या जीवनशैलीचा पुनर्विचार करायला लावणारे आहेत.
त्यांच्या या विचारांवरील - म्हणजेच गांधीवादावरील आणि पर्यायाने गांधीजींवरील- नेहरू, आचार्य अत्रे, सुभाषचंद्र बोस, जयप्रकाश नारायण, डॉ. आंबेडकर, शंकरराव खरात... अशा प्रतिभावंत विचारवंतांचे विचारप्रवर्तक लेख या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. असे लेखक आजच्या काळात किमान वाचण्यास मिळणे, हेही तसे दुर्लभच!