स्त्रीवादी चळवळ ही आधुनिक लोकशाहीवादी राजकारणाचा पाया असणारी चळवळ आहे. पुरुषांनी उभ्या केलेल्या व्यवस्थांचा पुनर्विचार करण्याची गरज आत्मभान आणि सामाजिक व्यवस्थांचा अभ्यास या दोन्हींमधून स्त्रियांच्या लक्षात आली.
स्त्रीवादाविषयी बोलणं म्हणजे फक्त स्त्रियांनी स्त्रियांच्या प्रश्नांविषयी बोलणं नाही, तर स्त्री आणि पुरुष दोघांनीही, ते प्रश्न निर्माण करणार्यान व्यवस्थेविषयी बोलणं. मानवी संस्कृतीचं प्रगल्भ रूप अहिंसक, संवादी आणि सत्याधिष्ठित स्त्री-पुरुष नात्यातून घडतं. त्यासाठी दोघांचंही प्रशिक्षण व्हावं लागेल. पुरुषसत्ताक व्यवस्थेने अनेक क्षेत्रात गंभीर प्रश्न उभे केले आहेत. त्यांच्यावर उपाय शोधायचा, तर त्यासाठी स्त्री-पुरुष नात्यात बदल घडवणं पायाभूत ठरेल. या विचारांमधून जे तत्त्वज्ञान निर्माण होतं आहे, त्याला स्त्रीवाद असं म्हणतात.
या तत्त्वज्ञानाची वाटचाल समजावी म्हणून पाश्चात्त्य स्त्रीवादाच्या आणि भारतीय स्त्रीवादाच्या जडणघडणीचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. तसंच स्त्रीवादी साहित्य कशाला म्हणता येईल आणि साहित्याची समीक्षा करण्यासाठी स्त्रीवादी निकष असू शकतील काय, याचा शोध घेतला आहे. स्त्रीवादी समीक्षेचे काही नमुनेही या पुस्तकात दिलेले आहेत.
स्त्रीवादाच्या अभ्यासकांना, तसंच स्त्रीवादाविषयी जिज्ञासा असणार्याद सर्वांनाच हे पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल.