गिजुभाई, ताराबाई, अनुताई यांची जडणघडण आणि कार्य स्वातंत्र्यलढ्याच्या काळातीलच होते. जरी राजकीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी थेट उडी घेतली नसली तरी, या लढ्यामागील स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तीन तत्त्वांचा आविष्कार, त्यांच्या आचरण आणि कृती यामध्ये वेगळ्या स्वरूपात झाला. पानसे यांची जडणघडण स्वातंत्र्यानंतर ताबडतोबच देशउभारणीच्या कल्पनेने भारलेल्या काळात झाली.
या चौघांवरही गांधीजींच्या विचारांचा विलक्षण प्रभाव दिसून येतो. तरीही त्यांनी कळत- नकळत काहीशी वेगळी वाट चोखाळली. समाजातील प्रत्येक स्तरातील बालकांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, ते विकसित करण्याचा त्यांंना पूर्ण हक्क आहे आणि यासाठी समाजाने त्यांना मदत करायला हवी, हे त्यांनी आपल्याला येथे प्रथम दाखवून दिले. यादृष्टीने पाहता या चौघांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळे परिमाण दिले, त्याची व्याप्ती वाढवली असे म्हणता येईल.