प्रा.डॉ.गेल ऑम्व्हेट या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या संशोधक विचारवंत होत्या.त्यांची वैचारिक बांधिलकी ही सिद्धांत आणि कृतिशीलता यांच्याशी होती. इटालियन विचारवंत ग्राम्सी यांना अभिप्रेत असलेला 'जैविक विचारवंत' हा त्यांच्या समाजशास्त्रीय संशोधनामध्ये आढळतो. डॉ. गेल ऑम्व्हेट यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतिकारक सांस्कृतिक विचारांना आंतरराष्ट्रीय अभ्यास विषयांमध्ये पहिल्यांदा आधिष्ठित केले. त्यांनी भारतातील जातवास्तवाचा प्रश्न हा समाजशास्त्रीय विचारविश्वात अग्रभागी आणला. स्त्री अभ्यासामध्ये वर्ग, जात, लिंगभाव आणि पर्यावरण यांच्यातील आंतरसंबंधांचा आलेख मांडला. त्याचबरोबर दलित स्त्रियांच्या अस्तित्वाची प्रारंभिक नोंद त्यांनी ठळक केली. डाव्या चळवळीतील चर्चाविश्व आणि कार्यक्रमपत्रिकेत फुले-आंबेडकरांचा क्रांतीदर्शी विचार उजागर करण्यामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. भारतातील मार्क्सवादी विचार परंपरा आणि सिद्धांतनाचे फुले-आंबेडकरी परिप्रेक्षात विश्लेषण केले तरच समृद्ध होऊ शकेल हा त्यांचा आग्रह आहे .बुद्धाचा धम्मविचार आणि तुकोबांचा भक्तीविचार यांचा चिकित्सक अभ्यास हा भारतीय तत्वज्ञानाची मूलगामी ओळख करून देणारा आहे. भारतातील नव्या सामाजिक चळवळी’नी क्रांतीची पुनर्व्याख्या व्यापक केली असे त्यांचे मत आहे .दलित बहुजन विचारवंतानी आणि नेत्यांनी रविदासाचा बेगुमपुरा ,फुलेंचे बळीराज्य,पेरीयारांचे द्रविडस्थान, शाक्य बौद्ध धर्मीयांचे बौध्द राष्ट्रकुल आणि डॉ.आंबेडकरांचे प्रबुध्द भारत या भावचित्राला साकार करावे हे त्यांचे भविष्यदर्शी प्रतिपादन आहे . या ग्रंथामध्ये डॉ. गेल ऑम्व्हेट यांच्या बहुविध संशोधकीय आयामांच्या मूलग्राही चिकित्सक लेखांचा अंतर्भाव आहे.
डॉ.सुरेंद्र जोंधळे
डॉ.सुरेंद्र जोंधळे