"नुकत्याच झालेल्या भीषण युद्धामुळे सगळंच उद्ध्वस्त झालंय... कलिंगदेशावर राज्य करणार्या नंद घराण्याचा पराभव झालाय... इथून थोड्याच अंतरावर असलेल्या तंबूतून चाळीसेक वर्षांचा एक इसम या सगळ्या संहाराकडे निराशेने बघतोय... गेले काही तास तो तंबूत नुसत्या येरझारा घालतोय... त्याचा पोशाख, त्याचा चेहरा, त्याच्या हालचाली कलिंगदेशाच्या हरलेल्या राजाला शोभतील अशा आहेत, मात्र त्याच्या तंबूवर युद्धात जिंकलेल्या मगध साम्राज्याचा ध्वज दिमाखात फडकतोय... त्याच्या आजूबाजूच्या तंबूंमध्ये तर उत्साहाचं वातावरण आहे. मग हाच इतका दुःखी का? हा नेमका आहे तरी कोण? जिंकण्यापलीकडची व्यर्थता बघणारा असा हा कोणता राजा आहे? - हा तोच आहे, ज्याला युद्धाने शांततेचं मोल शिकवलं. याचं नाव ‘सम्राट अशोक’!
मगधाच्या मौर्य साम्राज्याचा हा सम्राट अशोक... आजपासून साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेला एक थोर राजा! ‘कलिंगाचं’ हे युद्ध अशोकाच्या गोष्टीची सुरुवातही नव्हती किंवा शेवटही नव्हता... ते होतं, त्याच्या आयुष्याच्या गोष्टीतलं एक वळण. पण या एकाच वळणाने राजेपणाला एक नवीन झळाळी दिली. म्हणूनच आज अडीच हजार वर्षांनंतरही अशोकाची गोष्ट फक्त भारतातच नव्हे, तर जगभरात सांगितली जाते!