आध्यात्मिक बुद्धिमत्ता या शब्दाने आणि संकल्पनेने सध्या अनेक विचारवंत, मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ यांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. तार्किक बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता, बहुविध बुद्धिमत्ता यांच्या पार्श्वभूमीवर आता शैक्षणिक मानसशास्त्रात आध्यात्मिक बुद्धिमत्ता (Spiritual Intelligence) ही संकल्पना नव्याने येऊ घातली आहे.
आध्यात्मिकता हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा स्थायी भाव आहे. तो जीवनाच्या अत्युच्च सुखाशी व ध्येयाशी जोडलेला आहे. सर्व धर्म, पंथ, संप्रदाय, संस्कृती यांच्या पलीकडे जाऊन ही आध्यात्मिक वृत्ती माणसाला जीवनाच्या आकलनाकडे प्रेरित करीत असते. जीवनाचा अर्थ लावण्याला साहाय्य करते. नीतिमान व मूल्याधिष्ठित जीवन जगायला दिशा देते. खरी आध्यात्मिकता ही कोणत्याही प्रकारची धार्मिक कट्टरता, दुराग्रह, द्वेष, अंधश्रद्धा इत्यादी अनिष्ट गोष्टींपासून अलिप्त असते. ती ढोंगबाजीला बळी पडत नाही आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला दूर लोटीत नाही.