डॉ. कांबळे गेली सुमारे साडेतीन दशके रत्नागिरीत राहत आहेत व म्हणूनच कोकणच्या इतिहासाकडे ते साहजिकच ओढले जातात. त्यातूनच कोकणच्या संदर्भातील कोकण गांधींचे कार्य, विजयदुर्गचा इतिहास, कोकणातील इतिहास संशोधक, सावरकर आणि रत्नागिरी, वि. का. राजवाड्यांचे स्मरण, डॉ. आंबेडकरांच्या संदर्भातील आकाशवाणीवर प्रा. कांबळे यांनी दिलेली तीन वेगवेगळी भाषणे त्यांच्या वेगळेपणाची पुन्हा एकदा साक्ष पटवतात. कोकणातील वृत्तपत्रांचा इतिहास, कोकणातील ग्रंथालय चळवळीचा इतिहास, कोकणातील शेतकरी आंदोलनाचा इतिहास असे वेगवेगळे विषय शोधनिबंधात निवडताना दिसतात.
कोकणातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, इतिहासकार सदाशिव आठवले, मराठेकालीन व्यापार-उद्योग व दळणवळण, मराठेकालीन दुष्काळ, इत्यादी लेख वाचल्यावर लक्षात येते ते असे की, हा शोधनिबंध संग्रह म्हणजे प्राचीन ते अर्वाचीन कोकणसंबंधीचा एक संदर्भ ग्रंथच होय! या संग्रहातील प्रत्येक लेखाच्या शेवटी सविस्तर टिपा जोडल्या असल्यामुळे ग्रंथाचे संदर्भमूल्यही अधिक वाढले आहे. मराठी वैचारिक साहित्यात डॉ. कांबळे यांच्या ‘ऐतिहासिक शोधनिबंध संग्रहा’मुळे चांगलीच भर पडली आहे.
(प्रस्तावनेतून...)