ती अगदी साधीशीच काचबंद डबी त्याने नीट निरखून पाहिली. अल्बर्टने ती डबी कशीही धरली, तरी त्यातली डुगडुगती सुई मात्र पुन्हा पुन्हा उत्तर दिशेकडेच वळायची! ‘एखादी अदृश्य शक्तीच त्या सुईला असा हट्टीपणा करायला भाग पाडत असणार!’ वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी हाती आलेल्या कंपासने फिजिक्सच्या अदृश्य आणि अद्भुत नियमांचं कौतुक अल्बर्ट आइनस्टाइनच्या मनात असं पेरलं गेलं आणि या नियमांचा शोध हाच त्याच्या जन्मभराचा ध्यास बनून राहिला.
प्रकाशाच्या झोतावर स्वार होऊन प्रवास करता आला तर? दोर कापलेल्या लिफ्टमधून पडताना माणसाला गुरुत्वाकर्षण जाणवेल का? अशा काहीतरी भन्नाट कल्पना त्याला सुचायच्या. वर्षानुवर्षं या कल्पना त्याच्या मनात घर करून असायच्या. याच कल्पनाचित्रांचा माग काढत काढत त्याने सृष्टीची कोडी सोडवायचा प्रयत्न केला. आपल्या कल्पना गणिती भाषेत मांडण्यासाठी खूप खूप कष्ट घेतले. हे शोध विज्ञानाच्या जगासाठी महत्त्वाचे आहेतच, पण वयाच्या तिसर्या-चौथ्या वर्षापर्यंत धड बोलताही न येणारा बुजरा मुलगा; शिक्षकांना नकोसा असलेला, शाळा अर्धवट सोडून देणारा बंडखोर विद्यार्थी; पेटंट ऑफिसमधला साधा कारकून इथपासून विज्ञानाच्या जगाचा सुपरहिरो बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवाससुद्धा त्याच्या शोधांइतकाच सुरस आहे!