इतिहासाचें महत्त्व किती आहें हे निराळें सांगण्याची आवश्यकता नाहीं. हिंदुस्थानचा इतिहास म्हणजे विभिन्न राष्ट्रसमुच्चयाचा इतिहास आहे. त्यांची संगति जुळवून सर्व राष्ट्रांचे परस्पर संबंध लक्षांत घेतले पाहिजेत. त्यांवाचून त्या इतिहासाचें सोज्वळ स्वरूप कधीही व्यक्त होणार नाही. उदाहरणार्थ, महाराष्ट्र राज्यसत्तेचा इतिहास जरी तयार करावयाचा झाला तरी त्यास दिल्लीचे मोंगल बादशहा; हैदराबाद-बंगाल आणि अयोध्या येथील मुसलमान सुभेदार; राजस्थानांतील रजपुत राजे; पंजाबांतले शीख राजे; कर्नाटकांत पाळेगार संस्थानिक ह्या सर्वांची संपूर्ण माहिती मिळणे अवश्य आहे. ही माहिती प्राप्त होईपर्यंत तो इतिहास कधींही परिपूर्ण होणार नाहीं. ह्याकरितां मराठ्यांच्या इतिहासात साधनीभूत होणाऱ्या ह्या निरनिराळ्या भागांच्या माहितीचाही शोध करणें जरूर आहे.
अयोध्येच्या इतिहासाचा संबंध मराठ्यांच्या इतिहासाशी फारच निकट आहे. येथील पहिले तीन नवाब-सादतखान, मनसूरअली व सुजाउद्दौला हे मराठ्यांच्या उत्तरेकडील राजकारणांत समाविष्ट असून त्यांच्यापैकी शेवटचा नवाब सुजाउद्दौला ह्यानें पानिपतच्या लढाईंत मराठ्यांचा कधींही विस्मरण न होण्यासारखा घात केला; परंतु, मराठ्यांच्या रणशूर वीरांनी त्याचें प्रायश्चित त्यास दिलें; हे इतिहासावरून कळून येतें. तेव्हां ह्या तीन नवाबांचा व त्यांच्या वंशजांचा वृत्तांत समजणें जरूर आहे.
अयोध्येच्या इतिहासावर एके ठिकाणीं संगतवार असे ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळें निरनिराळ्या इंग्रजी पुस्तकांच्या आधारानें ही माहिती जमा केली आहे. तींत क्वचित दोष असण्याचाही संभव आहे. परंतु, ह्या पुस्तकाचा उद्देश इतिहासजिज्ञासूंना अयोध्येच्या नवाबांची ओळख व्हावी व ह्या इतिहासाचीं समग्र साधनें प्रसिद्ध करण्याची त्यांस प्रेरणा मिळावी इतकाच आहे.
- प्रस्तावनेतून