स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही युरोपच्या प्रबोधनातून जगासमोर आलेली आणि फ्रेंच राज्यक्रांतीने प्रत्यक्षात उतरवण्याचे आव्हान म्हणून स्वीकारलेली तीन मूलभूत मानवी मूल्ये मराठी विचारवंतांना कशी मार्गदर्शक ठरली हे पुस्तकात दाखवून दिले आहे. या राज्यसंस्था आणि सामाजिक न्याय ह्यांचा जुळ्यांचा संबंध असतो हा मुद्दा विस्ताराने मांडला आहे सामाजिक न्यायावर चिंतन करून, त्याची वाढ आणि त्याचा पुरस्कार करणाऱ्या, तसंच अनेक मराठी अभ्यासकांना अजूनही अपरिचित असलेल्या, पण महत्त्वाच्या विचारवंतांचा आणि आपल्या विचारांना प्रत्यक्ष धोरणांतून अमलात आणणाऱ्या राज्यकर्त्यांचा परिचय हा ग्रंथ करून देतो व हे या ग्रंथाचे अत्यंत महत्वाचे योगदान आहे. याचबरोबर हा ग्रंथ सामाजिक शास्त्रांच्या सर्वसामान्य पाठ्यपुस्तकांतून वगळल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या चिंतकांचीदेखील ओळख करून देतो.
– डॉ. जयंत लेले. ----
या पुस्तकात पवारांनी १४ विचारवंतांचे विचार अभ्यासले आहेत. त्यातील रानडे, गोखले, तिळक आणि नेहरू यांचा भर लोकशाही राजवट स्थापन करून त्याद्वारे सामाजिक न्यायाची धोरणे अमलात आणण्याचा होता, तर महात्मा फुले, सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, वि. रा. शिंदे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांचा भर सामाजिक न्यायावर होता. अर्थात त्यांना पण भारतात राज्यसंस्था उभी करायची होती. पण ती ज्याच्या आधारावर उभी राहणार आहे, त्या नागरी समाजातील जातीवाद आणि अन्याय नष्ट करण्यासाठी त्यांनी अग्रक्रम दिलेला आपणास दिसतो.
– डॉ. अशोक चौसाळकर