नुकतंच कॉलेज संपवून नोकरी जॉईन केलेल्या, तारुण्याच्या जीवन उर्जेने भरलेल्या पाच मित्र-मैत्रिणींची ही कथा आहे. यात मैत्री आहे. हळुवार खुलत जाणाऱ्या प्रेमकथा आहेत. त्यात झालेली फसवणूक आहे. चूक कळल्यावर गमावलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठीचा टोकाचा संघर्ष आहे. प्रसंगी मैत्रिणीसाठी आणि प्रेमासाठी जीव देण्याचीही तयारी दाखवणारे लोक यात आहेत.
कथा आणि व्यक्तिरेखा काल्पनिक असल्या तरीही त्या प्रत्यक्ष जीवनाच्या फार जवळ जाणाऱ्या आहेत. त्यामुळे या व्यक्तिरेखा फक्त नाव बदलून रोजच्या जीवनात आपल्या आजूबाजूला वावरत असल्याचा भास वाचकांना होतो. यात वास्तवाच्या जवळ जाणारे अनेक प्रसंग वाचकांना अंतर्मुख करतात आणि नकळतपणे वाचक कथेतील प्रत्येक व्यक्तिरेखेशी भावनिक जोडला जातो.
काळ बदलतो, पिढ्या बदलतात, परंतु जगाची रीत कधीही बदलत नाही. इंटरनेट व मोबाईलच्या काळातील नवी पिढी, ज्यांना जग पूर्णपणे कळलेलं नसतं; या कादंबरीचं प्रतिनिधित्व करते.
“बिनधास्त गर्ल्स” ही वाचकांना पानोपानी खिळवून ठेवणारी, सिनेमॅटिक ढंगात लिहिलेली मराठी साहित्यातील एक नावीन्यपूर्ण कादंबरी ठरते. युवा लेखक चेतन पाटील (निसाद) यांच्या लेखणीतून साकारलेली ही कादंबरी वाचकांसाठी एक रम्य, सुखद अनुभव ठरेल असा विश्वास वाटतो. .