अलीकडच्या काळात व्यापार व उद्योग केवळ श्रमप्रधान अथवा भांडवलप्रधान न उरता ज्ञानाधिष्ठित होऊ लागले आहेत. स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी व विकसित होण्यासाठी बौद्धिक संपदांची आवश्यकता वाटू लागली आहे.
समाजात सर्वच पातळ्यांवर बौद्धिक संपदा अधिकाराचे फायदे लक्षात येऊ लागले. अशा अधिकारांमुळे शोधकर्त्याला त्याच्या बुद्धी, वेळ व पैसा याची भरपाई व आर्थिक लाभ मिळू लागला. गुंतवणूकदारांना पारंपरिक मालमत्तेपेक्षा गुंतवणुकीसाठी वेगळे दालन खुले झाले. कंपन्यांना उद्योग व व्यापाराच्या मक्तेदारीची संधी मिळाली. समाजाला शोधांमुळे नवनवीन वस्तू, सेवा, उपकरणे मिळून संपन्नता प्राप्त झाली व देशांना जगात अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता निर्माण झाली. असे अधिकार मिळविण्याची शक्यता नसलेल्यांनी मात्र शोधांची नक्कल वा चोरी करायला सुरुवात केली. त्यापासून शोधास व शोधकर्त्यास कायद्याने संरक्षण हवे तसेच नक्कलकर्त्यास शासनही हवे, याची जाणीव विकसित देशांना लवकर झाली. भारतात हळद, बासमती, कडुलिंब यांची पेटंटस् विदेशी कंपन्यांनी घेतल्याचे समजल्याने सजगता वाढली. सर्वच स्तरावर बौद्धिक संपदा अधिकाराविषयी जिज्ञासा निर्माण झाली.
त्या जिज्ञासापूर्तीसाठी बौद्धिक संपदा अधिकाराचा अर्थ, त्यांचे प्रकार, ऐतिहासिक पार्श्वभूमी, कायदेशीर तरतुदी, आंतरराष्ट्रीय करारांचे संदर्भ, त्यांचे परिणाम, त्यांनी निर्माण केलेली आव्हाने यांची सोप्या मराठीत मांडणी करणारे डॉ. वि. म. गोविलकर यांचे हे पुस्तक.