फुटबॉल आपला दोस्तच होता. जसा रघ्या होता, ममद्या होता. ते आपल्यासाठी जसे कायपण कराले तयार असाचे तसंच हा फुटबॉलबी आपल्यासाठी करतोय.. आपल्या चांगल्यासाठी.. आपलं भलं व्हावं म्हणून आपल्या लाथा खातोय.. आपटतोय.. ठेचकाळतोय.. पर काही बोलत नाही.. त्याले बोलता आलं असतं तर त्यानं ममद्यासारखंच म्हटलं असतं की दोस्त तेरे लिये तो अपनी जान भी हाजीर है... ममद्या हमेशा म्हणाचा असं आपल्याले.. तो जसा आपल्यासाठी.. सार्या टीमसाठी आपटून घेतोय स्वताले, हाताची ढोपरं आणि पायाचे गुडघे फोडून घेतोय तसंच हा फुटबॉलबी करतोय.. लाथाडून घेतोय स्वताले.. आमचं चॅलेंज पुरं करता यावं म्हणून.. आम्हाले शाळेत जायले मिळावं म्हणून.. याचं.. ममद्याचं हे लाथाडणं वाया नाही जाऊ द्याचं आपण.. याची संगत नाही सोडाची आता आपण.. त्याच्या संगतीनंच आपली जिंदगी सुधारणार आहे आता..काही झालं तरी याची संगत नाही सोडाची.. आपण आपल्यालेच शब्द दिला..आणि तो पाळण्यासाठी आपण काहीबी कराले तयार होतो..
...परिस्थितीनं नाडलेल्या पण पोटातली आग न विझलेल्या जिद्दी मुला-मुलींची आणि या अनगढ दगडांमधून सुरेख शिल्पं घडवू पाहणार्या एका ध्येयवेड्या शिक्षकाची विलक्षण कथा...