‘सामाजिक न्यायाची संघर्षभूमी : कॉंग्रेसपुढील आव्हाने आणि भाजपचा उदय’ हा ग्रंथ निवडणूका आणि जात, राजकीय पक्ष आणि सामाजिक संघर्ष या दोन मुद्द्यांचे विवेचन करतो. याखेरीज शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या चढउतारातील सामाजिक आधारांमधील फेरबदल या ग्रंथात नोंदविलेले आहेत. मराठा-मराठेतरांच्यातील राजकीय संघर्षभूमीचे विश्लेषणदेखील या ग्रंथातून आपल्यासमोर येते. ही राजकीय कथा ओबीसीं च्या नव्या इतिहासाची आहे. इतर मागास समूहांच्या नेत्यांचा मराठा वर्चस्वाच्या विरोधातील चित्तवेधक स्वरुपाचा सत्तासंघर्ष आकडेवारीसह या ग्रंथात मांडलेला आहे.
लोकसभा, विधानसभा व स्थानिक शासन अशा तीन पातळ्यांवर सत्तासंघर्ष आणि स्पर्धा अस्तित्वात आहे. पक्षीय पातळीवर सत्तासंघर्ष भडक दिसतो. मात्र, हा फक्त मुखवटा आहे. वास्तविक खरा सत्तासंघर्ष व सत्तास्पर्धा सामाजिक पातळीवर अस्तित्वात आहे. विशेष म्हणजे, सामाजिक सत्तासंघर्षामधून मराठा विरोधातील एक राजकीय रणमैदान कसे तयार होत गेले, हे रणमैदान पुन्हा राजकीय पक्षांनी सत्तास्पर्धेसाठी उपयोगात कसे आणले, या दोन्ही महत्त्वाच्या मुद्यांचे विश्लेषण या ग्रंथात केले आहे.