उच्चजातीय बुद्धिजीवींनी मांडलेल्या सिद्धान्तांची विरचना करणे हे दलित स्त्रीवाद्यांपुढचे आव्हान आहे. कोणताही सिद्धान्त हा त्यांच्याशी किंवा त्यांच्या वास्तवाशी जुळणारा आहे किंवा नाही हे सतत तपासून पाहणे गरजेचे आहे. यामध्ये उच्चजातीयांनी निर्माण केलेल्या पद्धतिशास्त्राच्या संपूर्ण विच्छेदनाचा समावेश आहे. दलित स्त्रीवादाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे दलित स्त्रीवाद स्वत:चे असे सैद्धान्तिक विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यांतूनच दलित स्त्रीवादी दृष्टीकोन हा प्रमुख प्रवाही स्त्रीवादापेक्षा किंवा दलित पुरुषांच्या सिद्धान्तांपेक्षा अधिक सर्वसमावेशक होईल. परिणामी, दलित स्त्रीवादामध्ये सर्वाधिक एकात्म असे पर्यायी प्रमाणशास्त्र होण्याची क्षमता आहे.
वास्तवाच्या उपलब्ध आकलनाहून वेगळा दृष्टीकोन अंतर्भूत असलेली स्वत:ची अशी भूमिदृष्टी विकसित करण्याचा प्रयत्न दलित स्त्रिया करत आहेत. व्यक्तिनिष्ठा, कर्तेपणा अशा संकल्पनांचा पुनर्विचार ह्या भूमिदृष्टीमुळे होईल. दलित स्त्रीवादी पद्धतिशास्त्रानुसार कोणतेही सैद्धान्तिक संशोधनमूल्य वा भूमिका निरपेक्ष नसते, म्हणजेच दलित स्त्रीप्रश्न अभ्यासकांना विद्याशाखीय क्षेत्रात फार मोठी कामगिरी बजावावी लागेल.