आजच्या काळात शिक्षण हा आर्थिक विकासातील महत्त्वाचा घटक मानला जातो. उच्च शिक्षण प्रणालीत (महाविद्यालये, विद्यापीठे) इमारती, प्रयोगशाळा, यंत्रशाळा, ग्रंथालये, अभ्यासक्रम, परीक्षापद्धती इ. केवळ साधनमात्र असतात. अध्यापक हा मानवी घटक म्हणजे शिक्षणसंस्थांची खरी ऊर्जा ! महाविद्यालये, विद्यापीठे यांची उंची ही त्यातील अध्यापक व त्यासोबत विद्यार्थी यावरून ठरते. त्यांना पूरक वातावरण निर्माण करून सक्षम केले तर उपयुक्त ठरणारे कसदार शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण विद्यार्थी, दोन्ही दृष्टीस पडतात !
कनिष्ठ मध्यमवर्गातील अशाच एका अध्यापकाच्या कारकिर्दीचे टिप्पण म्हणजे ही ‘धडपड प्राध्यापकी’!...
कष्ट, स्वावलंबन याद्वारे पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी वयाच्या २०व्या वर्षी रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर येथील महाविद्यालयात अध्यापनास सुरुवात केली. त्यानंतर तब्बल ५० वर्षे ग्रामीण, अर्धनागरी, शहरी संस्था, विद्यापीठे येथे प्राचार्य, विभागप्रमुख इ. विविध जबाबदार्या पेलल्या.प्रत्येक काम म्हणजे नवे करून दाखविण्याची संधी असे मानून, अडचणी सोडवून कामाचा वेगळा ठसा उमटविला.
शिक्षण संस्थांतील राजकारण, प्राध्यापकातील हेवेदावे, यावर आधारित करमणूकप्रधान ललित साहित्यापेक्षा हे आत्मकथन वेगळे आहे. अध्यापक वर्गाची उभारी वाढवणारे त्यांना व संस्था चालकांना प्रेरणा लाभणारे आहे. शिक्षणाचे भविष्यात कोणते स्थान राहणार आहे? याचा वेध घेणारे हे चिंतन आहे.
आज महाविद्यालये व विद्यापीठे यातून असे ‘धडपडणारे प्राध्यापक’ मोठ्या प्रमाणात निर्माण होणे गरजेचे आहे.