देवळाच्या आवारात एक मूर्तिकार सुरेख मूर्ती घडवत असतो. त्याच्या जवळच एक पूर्ण घडवलेली आणि दुसरी तिच्यासारखीच आकार घेऊ पाहत असलेली, अशा दोन मूर्ती असतात. हे पाहून देवळात आलेले एक गृहस्थ मूर्तिकाराला विचारतात, “आपल्याला एकसारख्या दोन मूर्तींची आवश्यकता आहे का?” त्यावर मूर्तिकार म्हणतो, “खरंतर आम्हाला एकाच मूर्तीची आवश्यकता आहे, पण ही पहिली मूर्ती थोडी खराब झाली आहे, म्हणून मी दुसरी तयार करायला घेतली आहे.” गृहस्थ तयार मूर्ती निरखतात, पण त्यांना काही खोट दिसत नाही. ते प्रश्नार्थक नजरेने मूर्तिकाराकडे पाहतात, तेव्हा तो म्हणतो, “मूर्तीच्या नाकाजवळ एक ओरखडा पडला आहे आणि याच ठिकाणी एक चबुतरा बांधून त्यावर ही मूर्ती बसवली जाणार आहे”. गृहस्थ म्हणतात, “पण हा ओरखडा तर अगदीच किरकोळ आहे. तो कुणाच्याही लक्षात येणार नाही!” मूर्तिकार हसतच म्हणतो, “पण ज्या परमेश्वराची ही मूर्ती आहे, त्याला आणि मलादेखील तो ओरखडा कायम दिसत राहील!”
आपण स्वीकारलेली प्रत्येक गोष्ट परिपूर्ण होण्यासाठीची तीव्र ओढ म्हणजे 'सकारात्मकता'. हीच ओढ आपल्याला उत्कृष्टतेचा ध्यास लावते. केवळ व्यावसायिकच नव्हे, तर वैयक्तिक आयुष्यातही बाळगलेला हा ध्यास आपल्याला ध्येयपूर्तीकडे घेऊन जातो. सकारात्मकतेचं हेच मूल्य अंगी बाणवण्यासाठी हे पुस्तक आपल्याला निश्चित दिशादर्शक ठरेल!