वाणिज्य हा शब्द जरी बोजड वाटला, तरी सद्य:पिरस्थितीत तो सर्वमुखी झाला आहे. कारण एकूण ‘अर्थकारणालाच’ सध्याच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले दिसते. म्हणूनच या विषयाचे महत्त्व विचारात घेऊन अकरावीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, तसेच व्यवस्थापनशास्त्राचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी वाणिज्यकोशाची रचना करण्यात आली आहे. इंग्रजी किंवा मराठी वर्णमालेनुसार केलेली संज्ञांची रचना म्हणजे कोश, अशी कोशाबाबत आपल्या सर्वांची सर्वसाधारण धारणा असते; परंतु प्रस्तावित वाणिज्यकोशाचे स्वरूप यापेक्षा पूर्णत: भिन्न ठेवण्याचा धाडसी प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांना हवी असलेली माहिती विनायास मिळावी, हा या रचनेमागचा प्रमुख हेतू आहे. या कोशामध्ये वाणिज्य या विषयाचे एकूण ३४ प्रकरणांमध्ये (सोबत प्रकरणांची नावे दिलेली आहेत) विभाजन करण्यात आले आहे. अ, इ, उ, ऊ या वर्णमालेनुसार येणार्या संज्ञा, उपसंज्ञा, त्यांचे स्पष्टीकरण, सिद्धान्त, तुलना इ. बाबींनी प्रत्येक प्रकरण पिरपूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. तसेच आवश्यक तेथे प्रकरणाच्या शेवटी पिरिशष्टेही देण्यात आली आहेत. प्रस्तुत कोशाचे लेखनकार्य, संपादन, पडताळणी व पुर्नमूल्यांकन अशा विविध बाबींसाठी तीन वर्षांपेक्षा जास्त अवधी लागला असून या काळात वाणिज्य विषयाशी संबंधित असणाऱ्या अनेक नामवंत प्राध्यापकांचे साहाय्य कोशासाठी लाभले, हीच या कोशाचा दर्जा सिद्ध करणारी बाब ठरावी, असा विश्वास वाटतो.