समाजजीवनाचा वेध घेण्यासाठी समाजातील स्तरांचा अभ्यास करावा लागतो. आधुनिक समाजाच्या अशा अभ्यासात सामाजिक वर्ग लक्षात घ्यावे लागतात. पण भारताच्या संदर्भात मात्र वर्ण आणि जात हे घटकही महत्त्वाचे ठरतात. भारतात आधुनिक काळात वर्गव्यवस्था विकसित झाली खरी; पण नव्या वर्गव्यवस्थेने जुनी जातिव्यवस्था नष्ट केली नाही. जात आणि वर्ग यांचे सहअस्तित्व आणि सरमिसळ यांमुळे भारतीय समाजजीवन विलक्षण गुंतागुंतीचे बनले. ही गुंतागुंत समजावून घेण्यासाठी जात आणि वर्ग या दोहोंचा अभ्यास महत्त्वाचा आहे. आधुनिक महाराष्ट्राबाबत मोठ्या प्रमाणात जातिमीमांसा झालेली आहे, पण त्या तुलनेत वर्गमीमांसा झालेली नाही. प्रस्तुत ग्रंथ हा मात्र असा एक प्रयत्न आहे. अर्थात ही वर्गमीमांसा जातिमीमांसेला पर्यायी नसून पूरक आहे.
भारतीय मध्यमवर्गाविषयी स्वतंत्र व सविस्तर संशोधन झालेले आहे; पण महाराष्ट्रातील मध्यमवर्गाविषयी असे संशोधन फारसे आढळत नाही. एकोणिसाव्या शतकातल्या महाराष्ट्रातील मध्यमवर्ग हा भारतीय मध्यमवर्गाचाच भाग असला, तरी त्याचे असे खास वेगळेपणही होते. त्या वेगळेपणावर या संशोधनातून प्रकाश टाकलेला आहे. इतिहासातून सातत्य व बदलाची कहाणी उलगडत जाते. लेखकाने असा उलगडा महाराष्ट्रातील मध्यमवर्गाच्या उदयासंदर्भात केलेला आहे. महाराष्ट्रातील नवोदित मध्यमवर्गाने शिक्षण, प्रशासन, समाजकारण, अर्थकारण, राजकारण आणि साहित्य-संस्कृती या क्षेत्रांवर ताबा मिळवला आणि एकोणिसाव्या शतकाच्या इतिहासावर आपली मुद्रा उमटवली. या वर्गाने केवळ प्रांतिक समाजाला नव्हे, तर देशालासुद्धा नेतृत्व पुरवले. या प्रक्रियेची सुसंगत मांडणी करून मध्यमवर्गाचे सामर्थ्य व मर्यादासुद्धा हा ग्रंथ दाखवून देतो. डॉ. राजा दीक्षित यांनी लावलेला ऐतिहासिक अन्वयार्थ मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांना आणि जिज्ञासू वाचकांनासुद्धा उद्बोधक वाटू शकेल.