"जागतिक भूगोल हा प्रादेशिक भूगोलाच्या अभ्यासाचा पाया आहे. म्हणूनच बहुतेक विद्यापीठांमधून हा विषय शिकविला जातो. या विषयाचे महत्त्व जाणून स्पर्धा परीक्षांसाठीही याचा समावेश केलेला आढळतो. विद्यापीठ अनुदान मंडळानेही हा विषय मूलभूत विषय म्हणून सुचविलेला आहे. म्हणूनच प्रस्तुत पुस्तक तयार करताना महाराष्ट्रातील विद्यापीठांचे आणि स्पर्धा परीक्षांचे (UPSC/MPSC/NET/SET) अभ्यासक्रम डोळ्यांसमोर ठेवलेले आहेत.
जागतिक भूगोलाची मांडणी करताना खंडांना अनुसरून प्रकरणे तयार केलेली आहेत. यात हवामान, भूरूपे, भूस्तर रचना, नद्या, वनसंपदा, इ. प्राकृतिक घटकांनुसार व खजिनसंपत्ती, उद्योगधंदे, कृषिउत्पादने, शहरे इ. मानवी घटकांनुसार प्रत्येक खंडाची माहिती दिलेली आहे.
जागतिक भूगोलासाठी परिपूर्ण संदर्भग्रंथ तयार करण्यासाठी असंख्य संदर्भ ग्रंथ, माहितीपत्रके आणि नकाशे यांची मदत येथे घेतलेली आहे. प्रस्तुत पुस्तक भूगोल विषयाचे विद्यार्थी, अभ्यासक व प्राध्यापकांबरोबर स्पर्धा-परीक्षांच्या विद्यार्थ्यांना निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो. "