शाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जीवनप्रवास हा पारंपरिक आणि आधुनिक काळाच्या सीमारेषेवर व्यतीत झाला. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पारंपरिक ज्ञान, अनुभव आणि आधुनिक विचारांचा सुरेख संगम होता. त्यातूनच त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व फुलत गेले. त्यांच्या विचारातील पारदर्शकता, सखोलता, स्पष्टता आणि संवेदनशीलता या सर्व बाबी भावून आणि भारावून टाकतात. शिक्षण कमी असूनही अंतःकरणातील ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी सभोवतालच्या प्रतिकूल परिस्थितीचा वाङ्मयीन निर्मिती आणि मूल्यांवर परिणाम होऊ दिला नाही. ते आपल्या वाङ्मयीन जाणिवांशी नेहमीच प्रामाणिक राहिले. हेच शाहीर अण्णा भाऊ साठेंचे सर्वांत मोठे गुणवैशिष्ट्य मानावे लागेल. उत्तम कथाकार, कादंबरीकार, कामगारनेता आणि समाजसुधारक अशा अनेक भूमिका त्यांनी लिलया पेलल्या. ‘स्मशानातील सोनं’ या कथेत त्यांची गुणवैशिष्ट्ये प्रकर्षाने दिसून येतात. प्रतिकूल परिस्थितीशी झगडताना माणूस कसा असाहाय्य होत जातो याचे विदारक दर्शन त्यात घडते. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या ‘फकिरा’, ‘वारणेचा वाघ’ या कादंबर्यांनी माझे मनोविश्व व्यापून टाकले होते. शाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जीवन आणि कार्य यावर दर्जेदार ग्रंथ लिहावा अशी माझी मनोमन इच्छा होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या’ पुढाकाराने निघणार्या या ग्रंथाने ती पुरी होत आहे.
या ग्रंथासाठी मान्यवर लेखकांनी लेखन केले आहे. या लिखाणांमधून ‘शाहीर अण्णा भाऊ साठे’ यांच्या जीवनावर नव्याने प्रकाश पडेल आणि त्यांचे अनेक अज्ञात पैलू वाचकांसमोर येतील याबद्दल मला खात्री आहे. या ग्रंथाचे मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावताना मला अतिशय समाधान लाभत आहे. डॉ. पी. विठ्ठल, डॉ. राजेश्वर दुडूकनाळे यांनी ग्रंथनिर्मितीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.