शिवछत्रपतींच्या ‘मर्हाष्ट राज्य’ अथवा ‘हिंदवी स्वराज्या’च्या स्थापनेत महत्त्वाची कामगिरी ‘मावळप्रांत’, मावळे आणि मावळचे देशमुख यांनी बजावली. या सर्वांचे नेतृत्व, शहाजीराजे यांच्या आज्ञेनुसार, कारीचे देशमुख कान्होजी जेधे यांचेकडे होते. ‘जेधे शकावली-करीना’ ही जेधे घराण्याचा इतिहास सांगणारी साधने मूळ मोडी लिपी, त्याचे देवनागरी लिप्यंतर आणि इंग्रजी भाषांतरासह प्रथमच ग्रंथरूपाने अभ्यासकांच्या समोर येत आहे.
मोगल सम्राट औरंगजेबाच्या जन्मापासून (२४ ऑक्टोबर, १६१८) ते त्याने जिंजीला वेढा घातला (८ नोव्हेंबर १६९७) पर्यंतच्या बहुतांशी प्रत्यंतर पुराव्याने सिद्ध झालेल्या ऐतिहासिक घटनांच्या नोंदी या शकावलीत आल्या आहेत.
‘जेधे करीना’, म्हणजे ‘कान्होजी जेध्यांच्या मर्हास्टाचे पहाडी कलम’ अथवा जेधे घराण्याचा इतिहास. ही दोन्ही शिवकालीन प्रकरणे परस्परांना पूरक असून सतराव्या शतकाच्या इतिहासाची विश्वसनीय साधने आहेत.