माझ्या काठीच्या टकटकीचा आवाज त्या शांत तळघरात विरून जातोय न् जातोय, तोच त्या भिंतीतल्या थडग्यातून उलट आवाज आला! एखादं बाळ रडल्यासारखा तो आवाज पहिल्यांदा घुसमटल्यासारखा आणि तुटक तुटक होता. मग अचानक तो मोठा मोठा होत एक लांबलचक भेसूर किंकाळी ऐकू आली. कोणीतरी ओरडत होतं किंवा रडल्यासारखं किंचाळत होतं. त्या आवाजात भीती होती, पण एक प्रकारचा विजयी आनंदसुद्धा होता. खितपत पडलेल्या दुःखी आत्म्यांचं रडणं आणि त्यांचा छळ करणार्या असुरांचा राक्षसी आनंद याचं मिश्रण असलेली अशी भयंकर किंकाळी फक्त नरकातूनच ऐकू येऊ शकते!
विचक्षण वाचकांमध्ये पो त्याच्या लघुकथांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. त्याने लिहिलेल्या रहस्यकथा आणि गूढकथा केवळ रहस्य किंवा गूढ उकलणार्या नसतात, तर या कथांमध्ये मानसशास्त्रीय मर्मं दडलेली असतात. माणसाच्या नेणिवेत दडलेल्या अनाकलनीय आणि अतर्क्य गोष्टी पो आपल्या कथांमधून समोर आणतो.
या कथांमधून पो आपल्याला त्याच्या अलौकिक आणि अद्भुत विश्वात घेऊन जातो. या गुंगवून टाकणार्या कथांमध्ये केवळ भय आणि रहस्य नाही; त्यांच्यात उपहास आणि विनोदही आहे. तसंच मानवी प्रवृत्तींवर केलेलं भाष्यही आहे. म्हणूनच एवढा मोठा काळ लोटूनसुद्धा आजही या कथा मौलिक ठरतात.