
काशी उर्फ बनारस याचे नाव माहित नाही असा हिंदू सापडणे कठीण होईल. काशी हे तीर्थ हिंदू संस्कृती, धर्म व वैद्य यांचे केंद्र किंवा माहेरघर आहे अशी त्याची अनेक वर्षे कीर्ती आहे. ही कीर्ती भरतखंडाबाहेर प्राचीन काळी पसरली होती व हल्लीही पसरली आहे. प्राचीन विधींवरील विश्वास जरी दिवसेंदिवस उडत चालला असला, तरीही अजून काशीस दरवर्षी हजारो श्रीमंत व गरीब यात्रेकरू येतात व भक्तिभावाने गंगेमधून स्नान करून, विश्वेश्वराचे दर्शन घेऊन व पितरांना पिंड देऊन आपणास कृतार्थ करून घेतात. अशा तर्हेची जाज्वल्य धार्मिक श्रद्धा नसलेले हिंदूलोकही हे हिंदुधर्मकेंद्र पाहण्यास कुतूहल म्हणून येतात.
हिंदूंप्रमाणे बौद्ध व जैन यांनाही हे महत्वाचे तीर्थ वाटते. बौद्ध लोकांच्या चतुस्थळी यात्रेमध्ये सारनाथ हे महत्वाचे तीर्थ आहे. भगवान बुद्धांनी धर्मोपदेशास प्रथम काशीच्या उत्तरेस असणार्या सारनाथच्या धर्मरण्यात केली. जैन लोकांचे अकरावे तीर्थंकर श्रेयासनाथ यांचा जन्म बनारसला झाला होता.
अशा प्रकारे अनेक दृष्ट्या महत्वाच्या बनारस शहराबाबत सोपपत्तिक व सविस्तर माहिती देणारे हे पुस्तक मराठी वाचकांसाठी लिहिण्यात आले आहे.