आपत्ती निवारण हे अचूक अशा व्यवस्थापन कौशल्याशी संबंधित आहे. आपत्तीमुळे गोंधळाची स्थिती निर्माण होते. निवारणाचे कार्य पद्धतशीरपणे, एकजुटीने करणे हेच त्यासाठीचे नेमके उत्तर आहे. त्यात कोणी राजकारण आणू नये की सोयीस्कर अशी सत्ता समीकरणे जुळवू नयेत. केवळ मूठभर लोकांनाच त्याचा लाभ होऊ नये तर संकटांशी सामना करणार्या सामान्यांपर्यंत तो झिरपत जायला हवा, कारण त्यांनाच त्याची खरी गरज आहे. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अशा विविध बारीकसारीक गोष्टी या पुस्तकात मांडण्याऐवजी या पुस्तकात एक निश्चित पातळीवर करायच्या गोष्टी व कार्यपद्धती आजमावून तेवढ्यांचेच विवेचन केले आहे.
या पुस्तकात वाचकांना, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना, औद्योगिक कर्मचार्यांना व गृह संकुलातील रहिवाशांना, बिगर-शासकीय संस्थातील स्वयंसेवकांना आणि शासन यंत्रणेतील कर्मचार्यांना व अधिकार्यांना निश्चितच लाभ होईल. पुस्तकातील संकल्पनांचे, विचारांचे, आपत्ती निवारण्याच्या कार्यात त्यांना मार्गदर्शन व्हावे, हाच या पुस्तकांचा हेतू आहे.
युद्ध प्रसंगी जसे प्रत्येकास शिपाई बनावे लागते तसेच आपत्तीच्या प्रसंगी प्रत्येकास स्वयंसेवक म्हणून जबाबदारी घ्यावी लागते.
आपत्ती निवारण्याच्या प्रयत्नांत कुठलीही तडजोड होऊ शकत नाही आणि आजच्या विकासाच्या शर्यतीमध्ये हे प्रयत्न अधिक जटिल स्वरूपाचे झाले आहेत. अनेक संस्थांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाला महत्त्वाचे स्थान जरी मिळाले असले तरी वैयक्तिक पातळीवर हे प्रयत्न होणे गरजेचे आहे.