संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी झालेल्या अनेक नेत्यांनी, पत्रकारांनी त्यावर विपुल लेखन केले असले, तरी ते बरेचसे एकांगी, आत्मसमर्थन करणारे आहे. संशोधकांनी अस्सल कागदपत्रांचा मागोवा घेत ग्रंथ प्रकाशित केले आहेत. तरीही या लढ्याचा समग्र आणि तटस्थ मागोवा घेणार्या ग्रंथाची उणीव भासत होतीच. ही महत्त्वाची कामगिरी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक रविकिरण साने यांनी या ग्रंथाच्या रूपाने केली आहे.
संयुक्त महाराष्ट्र समितीचे काम म्हणजेच ङ्गक्त लढा, असा एकांगी विचार न करता कॉंग्रेसच्या प्रयत्नांचीही साधार माहिती या ग्रंथात आहे. मराठी कॉंग्रेस नेत्यांचे प्रयत्न का व कसे ङ्गसले आणि हा लढा विरोधी पक्षांच्या हाती कसा गेला, समितीच्या आंदोलनाने ‘महाराष्ट्र’ मिळाला, तरी ‘मंगल कलश’ मात्र यशवंतराव चव्हाणांच्या हातीच कसा गेला ही सर्व हकीकत ङ्गक्त लढ्याची नाही. विरोधी पक्षांचा वैचारिक गोंधळ, अहंमन्यता, ङ्गूट, महाराष्ट्रातील सामाजिक संघर्षातून आकारलेले नवे राजकारण, या सर्वांचा हा लख्ख आरसा आहे. या घुसळणीमधूनच महाराष्ट्राचे आजचे राजकारण तयार झाले आहे. त्यासाठी हा इतिहास समजून घ्यायला हवा. त्यासाठीच हे ग्रंथलेखन.