सद्यःकालीन स्थितीत अध्ययन, अध्यापन, संशोधन, परीक्षण आणि समीक्षण क्षेत्रांत आंतरविद्याशाखीय ज्ञान आणि संशोधनास महत्त्व आलेले आहे. हे लक्षात घेऊन, ‘लोकसहभाग आणि ग्रामीण विकास’ या ग्रंथाचे लेखन केले आहे. प्रस्तुत ग्रंथात ग्राम संकल्पना, ग्रामीण विकास, समुदाय संघटन आणि समुदाय संघटनात शासनाची भूमिका, विकासवाद, विकासवादाच्या पातळ्या या घटकांच्या स्पष्टीकरणाबरोबरच ग्रामीण विकास कार्यक्रम आणि उपक्रमांत येणार्या अडचणींचा आढावा घेण्यात आला आहे.
सदरील पुस्तकात स्वच्छता, स्वच्छतेचा अर्थ, विकसनशील देशातील स्वच्छतेची स्थिती, ग्रामीण पेयजल पुरवठा कार्यक्रम व धोरणे, ग्रामस्वच्छतेविषयीचा म.गांधीजींचा दृष्टिकोन आणि गांधीजींचे लोकसहभागीय स्वच्छता विचार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील स्वच्छता विचार, संपूर्ण ग्रामस्वच्छता अभियानाची पार्श्वभूमी, स्वच्छता अभियानाची उद्दिष्टे, स्वच्छता अभियानाची शासनाची भूमिका याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण असे विश्लेषण केले आहे. ग्रामीण पातळीवर कोणत्याही विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करावयाची असल्यास त्याबाबतचे नियोजन, संयोजन, समन्वयीकरण, एकत्रीकरण कसे करावे? याची परिपूर्ण माहिती या ग्रंथातून मिळण्यात मदत होईल.
तसेच ग्रामीण पातळीवर राबविण्यात येणार्या विविध विकास योजना आणि उपक्रम यांमध्ये लोकसहभागाचे महत्त्व विशद करण्यात आले आहे. पंचायती राज, पंचवार्षिक योजना, स्थानिक राजकारण, ग्रामस्वच्छता अभियानात युवक, महिला, ग्रामस्थ, राजकीय आणि प्रशासकीय व्यक्तीचे योगदानाबाबतचे विश्लेषण केले आहे; कारण आजघडीला ग्रामपातळीवर राबविण्यात येणार्या ग्रामस्वच्छता अभियान, रोजगार हमी योजना, म.गांधी तंटामुक्ती अभियान, इंदिरा गांधी आवास योजना, बचतगटाद्वारे ग्रामीण महिला सबलीकरण, जलयुक्त शिवार अभियान यांसारखे अभियान राबविताना लोकसहभागाचे महत्त्व प्रस्तुत ग्रंथातून प्रकटते. थोडक्यात, ग्रामीण विकासात लोकसहभागाचे महत्त्व, उद्देश, लोकसहभागाच्या पातळ्या, लोकसहभागाशी निगडित असलेल्या समाजशास्त्रीय सिद्धान्तांची मांडणी, लोकसहभागातील मर्यादा यांबाबतचे स्पष्टीकरण आढळते.