
सत्तेत असो अथवा विरोधी पक्षात, लोकप्रश्नी दृढभाव ठेवून सतत संघर्षाची भूमिका घेणार्या मा. ना. श्री. आर. आर. पाटील ऊर्फ आबा यांच्या विधानसभेतील निवडक भाषणांचा हा संग्रह त्यांच्या कामाची साक्ष पटविणारा आहे. संयम आणि आक्रमकता यांच्या सीमा पाळून आबा जेव्हा विरोधकांना लक्ष्य करतात तेव्हा, ‘भलेतरी देऊ | कासेची लंगोटी | नाठाळाचे माथी | हाणू सोटा ’ या तुकाराम महाराजांच्या उक्तीचा प्रत्यय आल्याशिवाय राहात नाही.
‘आपणावर भ्रष्ट्राचाराचे आरोप करताना आम्हाला खूप समाधान वाटते अशातला भाग नाही. लोकांच्या वतीने या व्यासपीठाचा आधार घेऊन कोणीतरी स्पष्ट बोललेच पाहिजे. अंत:करणावर धोंडा ठेवून ते काम आम्ही करीत आहोत’ असे जेव्हा आबा म्हणतात, तेव्हा सत्यनिष्ठेप्रती कठोर असलेल्या आबांना माणुसकीचा गहिवर कसा आवरता येत नाही हे सतत जाणवत राहते.
सत्तेत असताना, सत्तेचा माज अंगावर चढू न देता, आपल्या चुका व उणिवा नम्रपणे मान्य करून, त्या लगेच दुरुस्त करून घेणार्या आबांची विरोधी पक्षातली आक्रमकता त्यामुळे अधिकच शोभून दिसते. आबांच्या अंत:करणातली ही लोककल्याणाची तळमळ आणि मनाचा निर्मळपणा अनुभवायचा असेल तर ही भाषणे वाचायलाच हवीत.