किल्ल्यांना सध्या पर्यटन आणि ट्रेकिंगच्या छंदामुळे जरा बरे दिवस आले आहेत. कोणता किल्ला कोठे आहे, तेथे जायचे कसे, सोयी काय आहेत व तेथे काय इतिहास घडला याबद्दल अनेकजण माहिती करून घेताना आपल्याला आढळून येतात. पण आजचे त्यांचे स्वरूप पाहिले असता किल्ल्यांचा कणाच मोडून गेला असल्याचे आपल्याला जाणवते. आजच्या प्रगत युद्धतंत्रामुळे गडांचे महत्त्व संपुष्टात आले. पण या किल्ल्यांच्या आश्रयानेच येथे शातवाहन शिलाहार, आंध्रभृत्य, राष्ट्रकूट, यादव, यवन, मराठे, इंग्रज अशा राजवटी उभ्या राहिल्या. शिवकालात तर महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा अन् स्वराज्याचा इतिहास घडत होता. किल्ल्या-किल्ल्यावर शिवशाहीचे सुवर्णपान लिहिले जात होते. त्यावेळी गडकोट म्हणजे प्रचंड शक्ती होती. घामाच्या धारांनी अन् रक्ताच्या अर्घ्यांनी आपल्या पूर्वजांनी येथे इतिहास निर्माण केला, स्वराज्य निर्माण केले. हा देदिप्यमान इतिहास किल्ल्यांच्या रूपाने आपल्याशी बोलतो आहे. तो आपण समजला पाहिजे, जपला पाहिजे अन् पुढील पिढ्यांना सांगितला पाहिजे.