महाराष्ट्राची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत त्यात दुर्ग आणि लेणी ही महान वैशिष्ट्ये होत. जगातील सर्वाधिक दुर्ग (किल्ले) नि लेणी महाराष्ट्रात आहेत. दुर्गांकडे त्यामानाने पर्यटकांचे, अभ्यासकांचे, जिज्ञासूंचे बर्यापैकी लक्ष वेधले गेलेले आहे, पण लेण्यांकडे त्यामानाने अजून तितकेसे लक्ष गेलेले नाही. अजंठा, वेरूळ, कार्ले, भाजे, घारापुरी, बेडसे (भेडसे), कान्हेरी आदी लेणी चांगल्या प्रकारे प्रसिद्धी पावलेली आहेत पण त्याव्यतिरिक्तही खूप-खूप लेणी महाराष्ट्रात आहेत. ही संख्या शंभरच्या पुढे आहे. लेणी हा आपला महान अलंकार आहे, वैभव आहे. समृद्ध सांस्कृतिक ठेवा आहे.अशा लेण्यांचा इतिहास सुमारे दोन-सव्वादोन सहस्र वर्षांचा आहे. डोंगरात खोदलेली ही लेणी हे अद्भुत शिल्प बघून मनुष्य थक्क होतो. लेणी पाहाणे, अभ्यासणे, हा मोठाच आनंद आहे. ही लेणी आपल्याला प्राचीन काळात घेऊन जातात. वैदिक-बौद्ध-जैन ह्यांच्या एकात्मतेचा हा वारसा आहे.
पर्यटक, अभ्यासक, प्रवासी, सहलींचा आनंद लुटणारे ह्यांच्यासाठी हे पुस्तक आवर्जून सिद्ध केलेले आहे. त्यामुळे लेणी समजून घेणे सोपे जाईल. तीस लेण्यांचा इथे परिचय करुन दिलेला आहे. आपण अवश्य पाहावे, वाचावे, संग्रहावे असे हे पुस्तक.