या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात परस्परांना छेद देणारी कोणतीही विधाने न करता महाराष्ट्रातील संप्रदायांचे स्वरूप अतिशय समतोलपणे स्पष्ट केले आहे. यामागे त्यांची सुस्पष्ट, तर्कसंगत विचारसरणी व अभ्यासाची निकोप दृष्टी प्रत्ययास येते. अत्यंत नि:संदिग्ध स्वरूपात विषयाची मांडणी केली असल्याने सामान्य वाचकास या विषयाचा परिचय करून घेणे आनंददायी होईल. नाहीतर उलट-सुलट विधानांमुळे सामान्य वाचकाचा वैचारिक गोंधळ होणे शक्य असते. त्यामुळे हे काम वरवर पाहता साधे वाटले तरी ते तितके सोपे नसते हे निश्चित. लेखकाने अत्यंत यशस्वीपणे हा विषय हाताळलेला आहे.