‘महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन’ हा विषय महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये शिकविला जातो. नेट/सेट आणि स्पर्धा परीक्षेतदेखील याविषयाशी संबंधित अनक संकल्पनांचा अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. या पुस्तकाची रचना करताना दोन घटकांचा विचार केलेला आहे. प्रथम घटकात, महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात झालेल्या महत्त्वपूर्ण चळवळींचा आढावा घेतलेला आहे. आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण करणार्या सत्यशोधक चळवळ, दलित चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, आदिवासी चळवळ आणि शेतकरी चळवळी संदर्भातील माहितीचा समावेश प्रथम घटकातील पाच प्रकरणांमध्ये केलेला आहे.
पुस्तकाच्या दुसर्या घटकात, महाराष्ट्र प्रशासनाची ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सहाव्या प्रकरणात महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा थोडक्यात आढावा घेऊन राज्य प्रशासनाची वैशिष्ट्ये व रचना यांविषयी माहिती दिलेली आहे. सातव्या प्रकरणात सचिवालय, आठवव्या प्रकरणात जिल्हा प्रशासन आणि नवव्या प्रकरणात ग्रामीण व पोलीस प्रशासनाबद्दलची प्रकरणे समाविष्ट केलेली आहेत. दहाव्या प्रकरणात ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि अकराव्या प्रकरणात शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती देण्यात आली आहे. सचिवालयापासून ते ग्रामपंचायतीपर्यंतच्या राज्यप्रशासनातील विविध स्तरांबद्दलची माहिती पुस्तकात समाविष्ट केलेली आहे. पुस्तकातील संकल्पना सविस्तरपणे लक्षात येण्यासाठी अनेक उदाहरणांचा समावेश केलेला आहे. आवश्यक त्याठिकाणी संदर्भ दिलेले आहेत.
हे पुस्तक इतिहास, राज्यशास्त्र,समाजशास्त्र या विषयांचे अध्यापक व विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी निश्चित एक उपयुक्त संदर्भग्रंथ ठरेल.